maharashtra

शाहूपुरीत अनधिकृत नळ जोडणी बाबत पाणी पुरवठा विभागाचे मौन


Silence of water supply department regarding unauthorized tap connection in Shahupuri
सातारा शहरातील सातारा नगरपालिका हद्दवाढीमध्ये शाहूपुरीचा सहभाग झाला आहे. तसेच याठिकाणी कण्हेर धरणाचे पाणी सुद्धा येणार आहे. त्याची रंगीत तालीम तामजाई नगरात झाली असली तरी शाहूपुरीत अनधिकृत पाणी पुरवठा नळ जोडणीचे पितळ यानिमित्त उघड झाले आहे. कारवाई न करता 'घोरपडी बाई तुझी पाठ मऊ' असा कारभार होत असून त्याबाबत 'मौनीसाहेब' काहीही बोलत नसल्याची टीका होऊ लागली आहे.

शाहूपुरी : सातारा शहरातील सातारा नगरपालिका हद्दवाढीमध्ये शाहूपुरीचा सहभाग झाला आहे. तसेच याठिकाणी कण्हेर धरणाचे पाणी सुद्धा येणार आहे. त्याची रंगीत तालीम तामजाई नगरात झाली असली तरी शाहूपुरीत अनधिकृत पाणी पुरवठा नळ जोडणीचे पितळ यानिमित्त उघड झाले आहे. कारवाई न करता 'घोरपडी बाई तुझी पाठ मऊ' असा कारभार होत असून त्याबाबत 'मौनीसाहेब' काहीही बोलत नसल्याची टीका होऊ लागली आहे.
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी शाहूपुरी ग्रामपंचायत स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. तेव्हापासून आतापर्यंत काही भागाला कावेरी, गोदावरी, कृष्णा, गंगासागर कॉलनी अशी नावे असली तरी नियमितपणे नळाला पाणी मिळत नाही. उन्हाळ्यात वेळेत पाणी मिळत नसल्याने अनेकांना जीवन प्राधिकरण विरोधात आंदोलने करावी लागली होती.. शाहूपुरी ग्रामपंचायतीने काही भागात गटार बांधली नाहीत. तरीही नागरिकांना कर भरण्याच्या नोटिसा पाठवून कर वसुली अधिकारी कर्तव्य पार पाडत आहेत.
शाहूपुरीतील नागरिकांना सातारचे खासदार व आमदार यांच्या अथक प्रयत्नाने शाहूपुरी परिसरात कण्हेर धरणाचे पाणी सर्वांची तहान भागविणार आहे. हा सुखद अनुभव मिळणार आहे. तत्पूर्वी नवीन नळ जोडणी करताना शाहूपुरी भागात सुमारे अर्धशतक अनधिकृत नळ जोडणी केल्याची धक्कादायक बाब जमिनी खाली खड्डा करताना लक्षात आली आहे. याची काही महाभागांना कोणतीच फिकीर वाटत नसून राजकीय वरदहस्त असल्याने अधिकारी वर्ग कारवाई करीत नाहीत, हे सुध्दा स्पष्ट झाले आहे.
जुन्या नळाच्या कागदापत्रांची तपासणी करताना काही नळ जोडणी अनधिकृत असल्याची बाब उघड झाली असली तरी त्याबाबत फौजदारी गुन्हा का दाखल केला जात नाही? काही अधिकारी-कर्मचारी वर्गाने जनतेच्या करातून अशा पाणी चोरांची घरे दत्तक म्हणून चालविण्यासाठी घ्यावे. आमची काहीही तक्रार नाही. अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे, युवा कार्यकर्ते प्रतिक गायकवाड व वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या आयेशा पटनी व महिला वर्गानी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सातारा शहरालगत शाहूपुरी विभागात सुदैवाने सर्वजण हे राजकारणाच्या पलिकडे जावून लोकप्रिय नेते खा. श्री .छ उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणारे आहेत. त्यांचे समर्थक हे आजही त्यांच्या आदेशाची वाट पहात कामकाज करीत असतात. त्यांनी सुध्दा या प्रकाराबाबत 'आपलेच दात व आपलेच ओठ' अशा पद्धतीने बोटचेपीचे धोरण अवलंबिले आहे. सन्मानीय लोकप्रतिनिधीनी शाहूपुरीतील अशा झारीतील शुक्राचार्य यांची माहिती घेऊन त्यांच्या वर कडक कारवाई करण्याची स्वत:च मागणी करून पारदर्शक कारभाराची एकदा तरी चुणूक दाखवून द्यावी, अशीही मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, या भागात नवीन घरे बांधून काहींनी आगाऊ पैसे भरुनही त्यांना अद्याप नवीन पाण्याची नळ जोडणी मिळाली नाही. पण, अनधिकृत नळ जोडणी घेऊन ज्यांनी जीवन प्राधिकरण कार्यालयाचे हजारो रुपये बुडविले आहेत ते मात्र सत्कार, पदे, हारतुरे घेऊन मिरवित आहेत. अगोदर त्यांची पाणीपट्टी व दंडात्मक कारवाई करा. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. नंतर ज्यांनी पाणीच वापरले नाही. त्याची पाणी पट्टी वसुली करू नये. अन्यथा या कारभाराविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे.