...तर जलसंधारण अधिकाऱ्यांना गोमूत्राने अभिषेक घालणार
राष्ट्रवादी युवा प्रदेशाध्यक्ष अभय सिंह जगताप यांचा इशारा
वरकुटे-मलवडी ता. माण येथे बांधण्यात आलेल्या तुटका खडा तलावातील अधिग्रहित जमिनीचा 8 कोटी रुपयांचा मोबदला न दिल्यास कृष्णानगर सातारा येथील जलसंधारण अधिकारी सतीश लब्बा यांना येत्या 27 जून रोजी गोमूत्राने अभिषेक घालण्यात येणार आहे. तरीही गांभीर्याने न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र् प्रदेश सरचिटणीस अभयशिंह जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सातारा : वरकुटे-मलवडी ता. माण येथे बांधण्यात आलेल्या तुटका खडा तलावातील अधिग्रहित जमिनीचा 8 कोटी रुपयांचा मोबदला न दिल्यास कृष्णानगर सातारा येथील जलसंधारण अधिकारी सतीश लब्बा यांना येत्या 27 जून रोजी गोमूत्राने अभिषेक घालण्यात येणार आहे. तरीही गांभीर्याने न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र् प्रदेश सरचिटणीस अभयशिंह जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अभयसिंह जगताप पुढे म्हणाले, वरकुटे-मलवडी तालुका माण येथे तुटका कडा येथे जो तलाव 2012 रोजी पूर्ण झाला. त्या धरणाची मूळ किंमत अडीच कोटी रुपये होती. मात्र धरण पूर्ण होता-होता शंभर एकर जमीन संपादित झाली. त्याची शेतकऱ्यांना द्यावयाची रक्कम आठ कोटी पर्यंत पोचली. ही रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेप्रमाणे आयोजित बैठकीत जलसंधारण अधिकारी सतीश लब्बा यांनी येत्या एक महिन्यात हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवू, असे आश्वासन दिले होते. मात्र आजतागायत त्यांनी ते जलसंधारण मंत्रालयाला पाठवलेले नाही. या घटनेच्या निषेधार्थ जलसंधारण अधिकाऱ्यांना येत्या 27 जून रोजी आम्ही गोमुत्राने आंघोळ घालणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. जर ते कार्यालयात उपलब्ध नसतील तर ज्या दिवशी उपस्थित असतील त्या दिवशी त्यांची भेट घेऊन त्यांचा अभिषेक कार्यक्रम करण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने सुद्धा या प्रश्नांमध्ये संवेदनशीलतेने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकल्पामुळे माण तालुक्यातील पंचवीस ते तीस शेतकरी बाधित झाले असून त्यांना तातडीने रक्कम देण्यात यावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. जोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी हिरालाल हसन शेख, यासिन शेख, निवृत्ती भीमराव पोळ, करीम हसन शेख, किसन बबन पिसे, निवृत्ती रंगनाथ पिसे इत्यादी प्रकल्पग्रस्त शेतकरी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.


