maharashtra

कास पठारावरील बांधकामे अधिकृत करावीत


कास पठार परिसरातील बांधकामे अधिकृत करण्यात यावीत, याबाबत सर्व हॉटेल व्यवसाय, चालक-मालक, कामगार कास पठार विभाग, सातारा यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे मागणी केली आहे.

सातारा : कास पठार परिसरातील बांधकामे अधिकृत करण्यात यावीत, याबाबत सर्व हॉटेल व्यवसाय, चालक-मालक, कामगार कास पठार विभाग, सातारा यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळालेले कास पठार व त्या अनुषंगाने उदयास आलेले हॉटेल व्यवसाय व त्यातून निर्माण झालेली स्थानिकांना रोजगाराची संधी मिळाली आहे, असे असताना प्रशासनाकडून या बांधकामास नोटीसा दिल्याने येथील स्थानिकांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता या भागात स्थानिक नागरिकांनी आपल्या मालकीच्या जागेत हॉटेल व्यवसाय उभारले असून त्यातून आपला उदरनिर्वाह चालवित आहेत. तसेच काही मोठ्या उद्योजकांनी गुंतवणूक करुन हॉटेल व्यवसाय उभे केले आहेत. त्यामुळे युवकांना रोजगाराची संधी मिळाली आहे.
स्थानिक बेरोजगार युवकांकडे पुरेसे भांडवल नसल्याने इथं येणाऱ्या उच्च वर्गातील पर्यटक तसेच परदेशी पर्यटक यांना योग्य व उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी व त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने आपल्याच शहरातील काही भांडवलदार व्यक्तींनी गुंतवणूक करुन हॉटेल रिसॉर्ट तसेच निवासस्थाने उभारली आहेत. सदरची बांधकामे करताना शासन दरबारी लागणारी परवानगी व आवश्यक कागदपत्रे यांची माहिती देवून बांधकामे अधिकृत करण्यात यावीत. सदरच्या बांधकामामुळे पर्यावरणास कोणत्याही प्रकारची हानी होईल, असे कृत्य कुठेही झालेले नाही व यापुढेही होणार नाही, याची सर्वजण काळजी घेवू. पर्यटन विकास होण्यासाठी पर्यटकांना योग्य सेवा सुविधा पुरवण्यासाठी तसेच स्थानिकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून येथील हॉटेल व्यवसाय अबाधिक ठेवणे गरजेचे आहे.
सध्या झालेली बांधकामे ही कायदेशीररित्या अकृषिक नसली तरी ज्या जागेवर बांधकामे झालेली आहेत. ती भौगोलिकदृष्टीकोनातून अकृषिक व पडीत स्वत:च्या मालकीच्या जमीनीत आहेत . त्यासाठी आपण योग्य नियमावली तयार करुन काही बंधनकारक नियम लागू करुन काही कायदेशीर शर्थीच्या आधारावर सदरील हॉटेल व्यवसाय अधिकृत करण्यात यावीत., आपण घातलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत.