maharashtra

मलकापूर पालिकेचे अंदाजपत्रक कोणत्याही करवाढीशिवावाय मंजूर

नाविण्यपुर्ण योजनांचाही समावेश : सुमारे ७ लाख ७६ हजारांच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मान्यता

Malkapur Municipal Corporation's budget approved without any tax increase
मलकापूर नगरपालिकेचे सन २०२२-२३ या सालाचे अंदाजपत्रक विशेष सभेमध्ये एकमताने मंजुर करण्यात आले. या अंदाजपत्रकामध्ये कोणतीही कर वाढ न करता नाविण्यपुर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

कराड : मलकापूर नगरपालिकेचे सन २०२२-२३ या सालाचे अंदाजपत्रक विशेष सभेमध्ये एकमताने मंजुर करण्यात आले. या अंदाजपत्रकामध्ये कोणतीही कर वाढ न करता नाविण्यपुर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे. सन २०२२-२३ सालची एकूण महसुली व भांडवली जमा ६९ कोटी ५९ लाख ४९ हजार ७०२ एवढी गृहीत धरली असून ६९ कोटी ५१ लाख ७३ हजार ७०३ एवढा अंदाजीत खर्च आहे. तर ७ लाख ७५ हजार ९९९ रुपये शिल्लकीचे अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. नगराध्यक्षा सौ. निलम येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज पार पडले.
नगरपालिका अंदाजपत्रकातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये मलकापूर नगरपालिकेने लोकसहभागातून यापुर्वी विविध नाविण्यपुर्ण योजना हाती घेऊन यशस्वीरित्या सुरु ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 24x7 नळ पाणीपुरवठा योजना, प्रियदर्शनी कन्यारत्न योजना, श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान, राजमाता जिजाऊ सदृढ माता बालक योजना, महात्मा गांधी दिव्यांग पेंशन योजना या योजनांचा समावेश आहे.
गेली 2 वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नगरपालिकेने कोणत्याही नविन योजना हाती घेतल्या नव्हत्या. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नगरपालिकेने सिंधुताई सपकाळ महिला आरोग्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून या योजनेतून मलकापूर शहरातील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब, रक्तातील साखर तपासणी, हिमोग्लोबीन करण्यात येणार आहे. यासाठी 5 लाख रुपये, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विद्या वेतन योजनेअंतर्गत कोरोनामुळे निराधार झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेसाठी व मुलींच्या शिक्षणासाठी 5 लाख रुपये, कोरोनाने अडचणी आलेली शेतीची सुधारणा होणेसाठी व पशुधन विकासासाठी 5 लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
त्याबरोबरच नगरपालिकेने यापुर्वी सुरु ठेवलेल्या आनंदराव चव्हाण शैक्षणिक सहायता निधी, स्वा.सै. मा.आ. भास्करराव शिंदे आरोग्य जीवनदायी सहायता योजना, दिव्यांग पेंशन योजना, आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबीयांच्या कल्याणासाठी शौर्य सन्मान योजना, ई-लायब्ररी आदींसाठी ७१ लाख, शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत योजनेचा लाभ देण्यासाठी १.२१ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
तसेच कोरोनामुळे मलकापूर सोलर सिटी योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नागरिकांना देण्यात आली नव्हती. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य शासनाच्या (अपारंपारिक उर्जा विभाग) व मलकापूर नगरपालिकेच्या माध्यमातून सोलर वॉटर हिटर, सौर दिवे, तसेच नेट मीटरींग आदींसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आजी-माजी सैनिकांना घरपट्टी व इतर सुविधा मिळण्यासाठी १० रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. मलकापूर नगरपालिकेने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये कोणत्याही प्रकारची नव्याने कर वाढ प्रस्तावित केलेली नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा नागरिकांच्यावर टाकलेला नाही.