सन 2021-22 मधील गाळप झालेल्या ऊसाचे व्याजासह बिल द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा : सन 2021-22 मधील गाळप झालेल्या ऊसाचे व्याजासह बिल द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन 2021-22 मधील ऊस गाळप हंगामातील ऊस बिले अद्याप जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दिली नाहीत. आज हंगाम संपून जवळपास 4 ते 5 महिने उलटले तरीही शिल्लक रक्कम कारखानदार यांनी दिलेली नाही. त्यामुळे शुगर केन अँक्ट 1966 नुसार थकबाकीदार कारखानदार हे दोषी आहेत. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करून शेतकर्यांची शिल्लक रक्कम या कायद्याप्रमाणे 15 टक्के व्याजासह तात्काळ देण्यात यावी.
मुळात सातारा जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ ही शेतीमालवर अवलंबून आहे. गेली अनेक वर्षे सातारा जिल्ह्यात उत्पादीत होणार्या शेत माल सोयाबीन सोडले तर कशालाच दर न मिळाल्याने शेतकरी पुर्णपणे अडचणीत आला आहे. रोजच्या दैनंदिन गरजांसाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. एका पाठोपाठ एक संकट शेतकर्यांच्या मागे गेली अनेक वर्षे लागली आहेत. कोरोना काळात झालेले शेतकर्यांचे नुकसान अजून भरून निघाले नाही, तर वारंवार येणारी नैसर्गिक संकटे थांबत नाहीत. यातून शाश्वत पैसे मिळण्यावण्याचे पिक म्हणून ऊस पिक याचाच आधार असताना खाजगी व सहकारी कारखानदार शेतकर्यांचे हक्काचे पैसे देत नाहीत. प्रशासन गप्प बसून अजून कसे सामान्यांना लूटता येईल याच्या नवनव्या योजना बनवत असते. आम्हाला बँक व सोसायटीच्या माध्यमातून जे पिक कर्ज दिले जाते ते आम्ही वेळेत फेडायचे तिथे कायदा वापरतात व आमच्या हक्काचे करोडो रुपये फुकट वापरतात. तिथे कायदा का वापरला जात नाही? किंवा सहकारत शेतकरी मालक आहे असे फक्त सांगितले जाते.
एफआरपी सोडून ज्यादा झालेला नफा शेतकर्यांना दिलेले एक तरी उदाहरण दाखवावे. झालेला संपूर्ण नफा खर्चात समाविष्ट करायचा व शेतकर्यांना गडंवायचे, हे फार दिवसापासून सुरु आहे. व प्रशासन आमचेच पगार घेऊन वरून अश्या गोष्टी करणार्यांनाच पाठिंबा देत आहे हे वारंवार निवदने,आंदोलने करुन लक्षात आणून देऊन सुध्दा कोणतीही कारवाई होत नसल्याने आमच्या लक्षात येत आहे. या निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास शेतकर्यांना आंदोलने करावी लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जून साळुंखे, तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, कायदेशीर सल्लागार ऍड. विजय चव्हाण, उप तालुकाध्यक्ष संजय जाधव, प्रसिद्धी प्रमुख हेमंत खरात यांच्या स्वाक्षर्या आहेत.


