maharashtra

फलटणमध्ये न होणारी विकासकामे होत असल्याने मिस्टर रामराजेंच्या डोक्यावर परिणाम

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी मिस्टर रामराजेंची उरली सुरलीही काढली...

माढा मतदारसंघात ज्यांच्या कार्यकाळात झाली नाहीत ती कामे थोड्या अवधीतच पूर्णत्वास गेल्याने मिस्टर रामराजेंच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते काहीही वक्तव्ये करीत असल्याचे सांगत खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा येथे मिस्टर रामराजेंची उरली सुरलीही काढली.

सातारा : माढा मतदारसंघात ज्यांच्या कार्यकाळात झाली नाहीत ती कामे थोड्या अवधीतच पूर्णत्वास गेल्याने मिस्टर रामराजेंच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते काहीही वक्तव्ये करीत असल्याचे सांगत खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा येथे मिस्टर रामराजेंची उरली सुरलीही काढली.
सातारा विश्रामगृहात झालेल्या धावत्या भेटीच्या अनुषंगाने माध्यम प्रतिनिधींनी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर बसनात गुंडाळलेला नीरा-देवघर प्रकल्प साकारत 10 लाख लोकांना न्याय देण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी निर्णय घेतला. केंद्राच्या साथीने पंढरपूर रेल्वेला महाराष्ट्र सरकारने 50 टक्के वाटा देण्याचे कबूल करत निधीची तरतूद केली. सेशन कोर्ट फलटणला मंजुरीही मिळाली आहे. माढा मतदारसंघातील अनेक योजना मार्गी लागल्या आहेत. तसेच केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो कोटी रुपयांच्या रस्त्याची घोषणा केली. त्यामुळे फलटणमध्ये मिस्टर रामराजेंचे असलेलं प्रभुत्व आणि अचानक न करू शकणारी कामे ही काही महिन्यातच होत असल्याचे पाहून मिस्टर रामराजेंच्या मानसिकतेवर परिणाम झाला असून त्यांना मानसिक धक्का बसला आहे. एवढा मोठा कामाचा धडाका बघून रामराजेंना लोक प्रश्न विचारू लागले असल्याने रामराजे मानसिक तणावाखाली गेले असल्याची खरमरीत टीका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मिस्टर रामराजेंवर केली आहे.
ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये मी जी मतदारांना आश्‍वासने दिली होती, त्या पार्श्‍वभूमीवर माझी आश्‍वासनपूर्तीकडे वाटचाल सुरु आहे. माझ्या शिक्षणाबाबत मिस्टर रामराजे बोलत असले तर मी इलेक्ट्रिक मध्ये डिप्लोमा केला आहे. वास्तविक पाहता शिक्षणाचा आणि राजकारणाचा काय संबंध आहे, हे त्यांनाच माहिती असेल. राजकारणात काम करण्यासाठी कोणते वेगळे शिक्षण असल्यास मला ते माहित नाही, अशीही कोपरखळी त्यांनी मारली.
मिस्टर रामराजेंनी तुमच्या दहा पिढ्या राजकारणात येवू देणार नसल्याची माहिती दिल्यानंतर खा. रणजितसिंह म्हणाले, माझ्या वडिलांनी फलटण मध्ये अनेको विकास कामे केली. त्यांच्या पश्‍चात मी माझ्या मतदारसंघा प्रती जबाबदारी स्विकारुन विकासकामांची गंगा मतदारांच्या दारी पोहोचवली आहे. राजकारणात यायला प्रत्येकाची इच्छाशक्ती असावी लागते. त्यामुळे पुढचे कोणी सांगावे?
मिस्टर रामराजेंनी भाजपमध्ये येण्यासाठी नानाविध प्रयत्न केले. मात्र, त्यांना घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांच्यासाठी फक्त देवेंद्र फडणवीसच काफी आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी पुढील सभेत राष्ट्रवादीच्या घड्याळाचा लोगो, शरद पवारांचा फोटो गायब केला. त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळेस असे वाटते की आपल्याला भाजपमध्ये घेतील. मात्र तसे होत नाही, असेही ठणकावून खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.