maharashtra

ऐतिहासिक मंगळवार तळ्याला लाभले कारंजाचे सौंदर्य

नगरसेवक वसंत सेवे यांचे आणखी एक योगदान

सातारा शहराच्या पश्चिम भागामध्ये पर्यटकांसाठी पर्वणी ठरू शकणाऱ्या मंगळवार तळ्याने पुन्हा कात टाकली आहे. नगरसेवक वसंत लेवे यांनी स्वखर्चाने मंगळवार तळे जाळीबंद करून येथील जलस्त्रोताच्या शुद्धीकरणाची व्यवस्था केली होती.

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागामध्ये पर्यटकांसाठी पर्वणी ठरू शकणाऱ्या मंगळवार तळ्याने पुन्हा कात टाकली आहे. नगरसेवक वसंत लेवे यांनी स्वखर्चाने मंगळवार तळे जाळीबंद करून येथील जलस्त्रोताच्या शुद्धीकरणाची व्यवस्था केली होती. याच मंगळवार तळ्यामध्ये लेवे यांनी 15 लाख रुपये खर्च करून मनोहरी अशा कारंजाची व्यवस्था केली आहे. तळ्याचे पाणी आता थुई-थुई कारंजाच्या रूपात 15 फूट उंच उडणार असून संध्याकाळी तेथे फिरायला येणाऱ्या सातारकरांसाठी ती अनोखी भेट असणार आहे.

ऐतिहासिक मंगळवार तळे हे खासदार उदयनराजे भोसले यांच्या खाजगी मालकीची होते. काही वर्षांपूर्वी तळ्याची अवस्था अत्यंत दयनीय स्वरूपाची झाली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर या तळ्यातील श्री विसर्जन बंद करण्यात आले. मात्र तळ्याच्या पाण्याला उपसा नसल्याने या पाण्याला दुर्गंधी प्राप्त झाली होती. खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक नगरसेवक वसंत लेवे यांनी स्वखर्चाने मंगळवार तळे जाळीबंद करून त्याला भक्कम असे लोखंडी गेट बसवले. तसेच मंगळवार तळ्याच्या चारी बाजूचे गवत काढून तळ्यातील पाण्याची अभिसरण व्यवस्था तयार केली. या कामांमध्ये लेवे यांना तब्बल दहा लाख रुपये खर्च आला.

मात्र, पेठेतील नागरिकांना वसंत लेवे यांनी मंगळवार तळ्यामध्ये कारंजे फुलवणार, असा शब्द दिला होता. त्यानुसार वसंत लेवे यांनी तळ्याच्या मध्यभागी चार लेयरची पाण्याची परिसंचलन योजना तयार केली. या माध्यमातून पाणी पंधरा फूट उंच कारंजाच्या स्वरूपामध्ये उडणार आहे. या प्रयोगाची नुकतीच रंगीत तालीम घेण्यात आली आणि कारंजे सुरू झाल्यानंतर या संदर्भात नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मंगळवार तळे प्रतिष्ठानच्या सदस्या हेमांगी जोशी यांनी खऱ्या अर्थाने मंगळवार तळ्याला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मी लहानपणापासून मंगळवार तळे पहात आले आहे. तळ्याचे सुशोभीकरण, सौंदर्यकरण करण्यामध्ये वसंत लेवे यांचा मोठा वाटा आहे. या तळ्याच्या सुशोभीकरणांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा त्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. त्याप्रमाणे तळ्याचे सुशोभीकरण झाले आहे, याचे आम्हाला अत्यंत समाधान आहे. तळ्यामध्ये कारंजाची व्यवस्था झाल्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढणार असून संपूर्ण पाण्याचे अभिसरण होऊन ऑक्सिजननिर्मिती होणार आहे. ऑक्सिजन निर्मितीमुळे तळ्याची परिसंस्था वेगळ्या पद्धतीने विकसित होण्यास मदत होणार असल्याचे पर्यावरणाच्या जाणकारांनी सांगितले.

 

मंगळवार तळे हा तळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. ऐतिहासिक तळ्याचे सौंदर्य राखणे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्या तळ्याला चालना देणे हे महत्त्वाचे होते. पेठेतील नागरिकांना मी शब्द दिला होता. त्यापद्धतीने तळे जाळीबंद झाल्यानंतर कारंजे सुरू करण्याचा पुढचा टप्पा गाठला गेल्याने मला अति समाधान आहे. शहराच्या पश्चिम भागामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एखादं सौंदर्यस्थळ असावे, ही सर्वांचीच इच्छा होती. मात्र त्यामध्ये नियोजन दृष्टीपथात येत नव्हते. आम्ही स्वतः याचे नियोजन करून आणि आमचे आघाडीचे मार्गदर्शक खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या कारंजाची आम्ही व्यवस्था केली आहे. कारंजे अजून आकर्षक पद्धतीने वेगवेगळ्या रंगात कसे सादर करता येईल, या दृष्टीकोनातूनही आमचा विचार विनिमय सुरू आहे.

- वसंत लेवे (माजी नगरसेवक)