maharashtra

पानवण येथून सुमारे 60 किलो गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई

पानवण, ता. माण येथून स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलीस ठाण्यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 60 किलो गांजा जप्त करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

सातारा : पानवण, ता. माण येथून स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलीस ठाण्यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 60 किलो गांजा जप्त करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
चरण लालासो शिंदे वय 30, रा. पानवण, तालुका माण असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी एन. डी. पी. एस. कायद्यांतर्गत कारवाया करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर तसेच सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्यानुसार देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या अधिपत्याखाली पथक तयार करून त्यांना एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
दिनांक 27 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे आणि त्यांच्या सोबतचे म्हसवडचे अंमलदार हे सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पानवन तालुका माण येथील चरण लालासो शिंदे याने त्याच्या राहत्या घराजवळील शेतामध्ये गांजा या अंमली पदार्थाचा साठा करून उसाच्या शेतामध्ये लपवून ठेवला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर भोरे आणि म्हसवड पोलीस ठाण्याचे अंमलदार, पंच आणि राजपत्रित अधिकारी यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने छापा मारण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन तसेच वरिष्ठांच्या सूचनानुसार माहिती मिळाल्या जागी जाऊन सापळा रचला. तिथे माहिती मधील इसम हा उसाच्या शेता लगतच उभा राहिलेला दिसला. सापळ्यातील अंमलदार यांनी त्यास ताब्यात घेऊन मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शेतामध्ये शोध घेतला असता शेतामध्ये एका ठिकाणी तीन पोती ठेवलेली दिसली. त्याबाबत चरण शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता तो उडवाउडवीची  उत्तरे देऊ लागला. त्यास अधिक विश्वासात घेतले असता त्याने पोत्यामध्ये गांजा असल्याचे सांगून तो त्याच्याच मालकीचा असल्याचे सांगितले. कारवाईत उपस्थित असलेल्या फॉरेन्सिक टीमने या गांजाची किटद्वारे तपासणी करून वजन काट्याद्वारे त्याचे वजन केले असता त्याचे वजन 60 किलो 100 ग्रॅम भरले. या सर्व मालास पोलिसांनी पंचांसमक्ष जागेवरच सील करून हा मुद्देमाल जप्त केला. याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या सूचनांप्रमाणे म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, रवींद्र डोईफोडे, पोलीस हवालदार आतिश घाडगे, संजय शिर्के, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, गणेश कचरे, मुनीर मुल्ला, पोलीस नाईक प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, पोलीस कॉन्स्टेबल मयूर देशमुख, धीरज महाडिक, मोहसीन मोमीन, संकेत निकम, वैभव सावंत, स्वप्निल दौंड, म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल काकडे, भादुले तसेच फॉरेन्सिक टीमचे पोलीस हवालदार मोहन नाचण, पोलीस कॉन्स्टेबल अनिल खटावकर, राजीव कुंभार यांनी केली असून कारवाई सहभागी झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि आणि पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.