वेचले येथे वनविभागाच्या कारवाईत 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
सरत्या वर्षातील सर्वात मोठी कारवाई; सागवान, रायवळ लाकडांसह ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात
वेचले, ता. सातारा गावच्या हद्दीत वन विभागाने कारवाई करत विनापास, विनापरवाना सागवान, रायवळ लाकडांची वाहतुक करून ठेवण्यात आलेला ट्रॅक्टर- ट्रॉली ताब्यात घेतली. या कारवाईत लाकडांसह ट्रॅक्टर-ट्रॉली असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सरत्या वर्षातील वनविभागाची आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
सातारा : वेचले, ता. सातारा गावच्या हद्दीत वन विभागाने कारवाई करत विनापास, विनापरवाना सागवान, रायवळ लाकडांची वाहतुक करून ठेवण्यात आलेला ट्रॅक्टर- ट्रॉली ताब्यात घेतली. या कारवाईत लाकडांसह ट्रॅक्टर-ट्रॉली असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सरत्या वर्षातील वनविभागाची आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
गेल्या काही दिवसात वन विभागाने सातारा तालुक्यात बेसुमार वाढलेल्या वृक्षतोडीच्या घटना उघडकीस आणल्या असुन कोठे बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्यास त्याची माहिती वन विभागाला देण्यात यावी. त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी केले.
याबाबत वन विभागाने दिलेली माहिती अशी, वेचले, ता. सातारा गावच्या हद्दीत जावळे वस्तीनजीक सातारा येथील रियाज पालकर यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. 09 - बीपी 4273, ट्रॉली क्रमांक एम.एच. 12 सीक्यू 4291 मध्ये विनापास, विनापरवाना सागवान, रायवळची लाकडे वाहतूक करून आणून ठेवल्याची माहिती दि. 24 डिसेंबर रोजी सामाजिक वनीकरणाचे सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले, सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी वन विभागाच्या पथका समवेत त्यांनी घटनास्थळी छापा टाकला असता सागवान, रायवळने भरलेला ट्रॅक्टर - ट्रॉली त्यांच्या निदर्शनास आली. वन विभागाच्या पथकाने तात्काळ लाकडांनी भरलेली ती ट्रॅक्टर-ट्रॉली असा दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत ठोसेघर, भरतगाव, रोहोट, धावली, पळसावडे, खडगाव येथील वनरक्षक यांनी सहभाग घेतला.
बेकायदेशीर वृक्षतोड, वाहतुकीसंदर्भात माहिती कळवा
सातारा तालुक्यात वन विभागाच्या माध्यमातून सातत्याने बेकायदेशीर वृक्षतोड आणि वाहतुकीवर कारवाई करूनही त्यामध्ये खंड पडला नसल्याचे दिसून येत आहे. वन विभागाच्या परवानगीशिवाय कोठे वृक्षतोड अथवा लाकडांची वाहतूक निदर्शनास आल्यास नागरिकांनी मनामध्ये कोणताही संकोच न ठेवता सातारा वन विभागाची संपर्क साधावा त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन निवृत्ती चव्हाण यांनी केले आहे.


