जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘खंडाळा शाखा व विभागीय कार्यालय, खंडाळा ’ या नूतन इमारतीचे नुतनीकरण उदघाटन बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या शुभहस्ते आणि संचालक दत्तानाना ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘खंडाळा शाखा व विभागीय कार्यालय, खंडाळा ’ या नूतन इमारतीचे नुतनीकरण उदघाटन बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या शुभहस्ते आणि संचालक दत्तानाना ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
याप्रसंगी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन लक्ष्मणराव जाधव (पाटील) व संचालक दत्तात्रय ढमाळ यांची बिनबिरोध निवड झाल्याने बँकेच्या खंडाळा तालुका अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी नितीन पाटील म्हणाले, खंडाळा येथील बँक इमारत ३० वर्षापूर्वीची असल्याने आधुनिक, सुसज्ज व कॉर्पोरेट लुक असणारी इमारत व्हावी अशी सर्वांची मागणी होती. बँकिंग क्षेत्रामध्ये तीव्र स्पर्धा असून आपल्या बँकेने खाजगी बॅंकेप्रमाणेच ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्न केले आहेत. या भागातील ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सर्व सुविधा ग्राहकांना देता याव्यात यासाठी कॉर्पोरेट लुक दिला आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशपातळीवर अग्रस्थानी असून, या बँकेचे विकासाभिमुख वाटचालीमध्ये अनेक दिग्गजांचा सहभाग आहे. बँकेचा नावलौकिक महाराष्ट्रातच नव्हेतर संबंध देशभर झालेला आहे. बँकेला चांगला इतिहास असून स्व. यशवंतराव चव्हाण, आर .डी .पाटील, आबासाहेब वीर या महान नेत्यांचे नेतृत्व लाभल्यामुळे चांगली आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार व राजकारण विरहीत कामकाज केले जात असून बँक आर्थिकदृष्टया भक्कम आहे. कै. लक्ष्मणराव पाटील (तात्या) बँकेच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी बँकेचे कामकाज उत्तमप्रकारे केले आहे. सर्व सामान्य घटकांना न्याय देण्याची त्यांची कामाची हातोटी होती. बँकेचा संचालक म्हणून कामकाज करीत असताना बँकेचे काम जवळून पाहिलेले असून याचा अध्यक्ष म्हणून कामकाज करीत असताना निश्चितच उपयोग होणार आहे.
यावेळी दत्तानाना ढमाळ म्हणाले, सातारा जिल्हा बँक देशामध्ये नावाजलेली असून सहकारी बँकिंग क्षेत्राला आदर्शवत काम करीत आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर उंचावत आहे. नितीन पाटील यांना बँकेच्या कामकाजाविषयी अत्यंत आत्मीयता व तळमळ आहे. ते सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव आग्रही राहतात. सर्वसामान्य शेतकरी सभासदांच्या उन्नतीसाठी व बँकेच्या हितासाठी चांगले कामकाज करण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत, असे सांगून त्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्या दिल्या.
याप्रसंगी उपव्यवस्थापक जयवंत पवार, विभागीय विकास अधिकारी अरविंद यादव, तसेच अधिकारी व सेवकवर्ग ग्रामपंचायत सरपंच/सदस्य, वि.का.स. सेवा सोसायटीचे चेअरमन/ सदस्य, बँकेचे ठेवीदार व हितचिंतक, सभासद व ग्राहक, शेतकरी, ग्रामस्थ, मार्केट कमिटी संचालक, महिला बचतगटांचे सदस्या, जेष्ठ नागरिक, यांनीही नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


