एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस सक्त मजुरी तसेच दंडाची शिक्षा ठोठवली आहे.
सातारा : एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस सक्त मजुरी तसेच दंडाची शिक्षा ठोठवली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 12 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सतीश नथुराम आवळे व 26 राहणार मालगाव तालुका सातारा हा सटवाई देवी मंदिरात जेवण करीत असताना रणवीर नारायण सावंत वय 30, रा. सोनगाव, तालुका सातारा याच्यासह तीन साथीदार यांना पाणी पिण्यासाठी पाण्याचा जग मागितला असता सावंत याने सतीश आवळे यास शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. तसेच आवळे यास जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने भोकसले. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एच. डी. साठे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले होते.
हा खटला प्रथम जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या कोर्टात चालला होता. सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील म्हणून श्रीमती सुरेखा क्षीरसागर यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. या खटल्यात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांच्या साक्षीवरून न्यायालयाने रणवीर नारायण सावंत याला एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. इतर तीन आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल तसेच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक एस. पी. वाघ यांनी या खटल्यात मदत केली.


