maharashtra

सातारा पालिकेचे मुख्याधिकारी आणि भाग निरीक्षक साखरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा!

जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर ‘आप’चे सरदार (सागर) भोगांवकर यांचे आमरण उपोषण सुरु

करंजे नाका ते मोळाचा ओढा दरम्यान रस्त्यांवर सातार्‍यातील व्यापार्‍यांनी पत्र्याची लोखंडी शेड्स उभारुन मेढा-सातारा मुख्य रस्त्यावरच गेल्या काही वर्षात अतिक्रमणे केलेली आहेत. त्याविरोधात गेली आठ महिने आंदोलने, पत्रव्यवहार करुनही त्यावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरु केले आहे.

सातारा : करंजे नाका ते मोळाचा ओढा दरम्यान रस्त्यांवर सातार्‍यातील व्यापार्‍यांनी पत्र्याची लोखंडी शेड्स उभारुन मेढा-सातारा मुख्य रस्त्यावरच गेल्या काही वर्षात अतिक्रमणे केलेली आहेत. त्याविरोधात गेली आठ महिने आंदोलने, पत्रव्यवहार करुनही त्यावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरु केले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करंजे नाका ते मोळाचा ओढा दरम्यान रस्त्यांवर सातार्‍यातील व्यापार्‍यांनी पत्र्याची लोखंडी शेड्स उभारुन मेढा-सातारा मुख्य रस्त्यावरच गेल्या काही वर्षात अतिक्रमणे केलेली आहेत. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. या अडथळ्यांमुळे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर अपघातही झाले आहेत. परंतू गरीबांना वेगळा आणि व्यापार्‍यांना वेगळा न्याय, याप्रमाणे पालिकेने मोळाचा ओढा येथील व्यापार्‍यांना नेहमीच सॉफ्ट कॉर्नर देत त्यांनी केलेल्या अतिक्रमणांकडे कानाडोळा केलेला आहे.
नगररचना अधिनियमाप्रमाणे अनधिकृत अथवा अतिक्रमित बांधकामास शास्ती लावणे याचा अर्थ सदरील बांधकाम हे कायदेशीर होत नाही. बड्या धेंडांना शास्ती लावून सदरील बांधकामांना अप्रत्यक्षरीत्या अभय देण्याचं काम सातारा नगरपरिषदेने केले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड करण्यात आली आहे. रिबन डेव्हलपमेंट ऍक्ट नुसार सातारा शहरातून जाणारा महाबळेश्वर-पंढरपूर हा राज्यमार्ग असून कायद्यानुसार सामासिक अंतर सोडणे हे सर्वांना बंधनकारक आहे. त्याशिवाय शास्ती लावता येत नाही. वास्तविक ही जागा नागरी विभागामध्ये समाविष्ट होत असल्याने ही सर्व बांधकामे रस्त्याच्या मध्यापासून 20 मीटर अंतरावर अथवा हद्दीपासून 4.5 मीटर अंतरावर (यापैकी जास्त असेल असे अंतर लागू) करण्याबाबतचा नियम आहे. आम्हाला व सातार्‍यातील तमाम जनतेला वेडे बनवण्याचे काम सातारा नगरपरिषदेने चालू केले आहे. मी सदरील अतिक्रमणासंदर्भात आठ महिन्यापासून पाठपुरावा करत असून नगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी सात निवेदने देण्यात आलेली आहेत. तरीही सातारा नगरपरिषद अतिक्रमण विभाग, नगररचना विभाग आणि सीईओ यांना तीळमात्रही फरक पडलेला नाही. गोरगरिबांचे हातगाडे यांना दिसतात, पण बड्या धेंड्यांसाठी सोयीस्कर अशी नियमावली तयार केली जाते. यासंदर्भात योग्य त्या न्यायालयाकडे जाणार असून संबंधितांना चौकशी लावून निलंबित होईपर्यंत गप्प बसणार नाही.
सदरील भाग निरीक्षक सतीश साखरे हा बिगारी असताना भाग निरीक्षक हे तांत्रिक पद असताना प्लॅनवर स्कुटींवर याला सह्या करण्याचे अधिकार कोणी दिले? याबाबत चौकशी करण्यात यावी. आजपर्यंत दहा वर्षांमध्ये सतीश साखरे यांची ज्या-ज्या ठिकाणी भाग निरीक्षक म्हणून नेमणूक झालेली आहे, त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमणाबाबत चौकशी केल्यास सर्वात जास्त अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हे सतीश साखरे यांच्या विभागात दिसून येते. याबाबत लाखो रुपयांची माया सतीश साखरे यांनी जमवलेली आहे. याची इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून चौकशी करण्यात यावी. तसेच दहा वर्षांमध्ये स्कुटीने तसेच प्लॅन व 52 53 सतीश साखरे यांच्या विभागामध्ये देण्यात आले असून आजवर शून्य कारवाई करण्यात आलेली आहे. याचा अर्थ सतीश साखरे हा सातारा नगर परिषदेतील प्रशासनास हाताशी धरून आपले हात ओले करून घेत आहे. सदरील सतीश साखरे यांच्यावर त्वरित चौकशी करून त्यास निलंबित करण्यात यावे. तसेच पालिकेचे मुख्याधिकारी यांनी शासकीय संदर्भात पदाचा गैरवापर केल्याने त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
मी आज दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी पासून आपल्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणास बसलो असून माझ्या जिवितास बरे-वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी पालिका मुख्याधिकारी आणि संबंधित भाग निरीक्षक सतीश साखरेच जबाबदार असल्याचा इशारा देत आहे.