maharashtra

सातारा येथे जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचारी, शिक्षकांची दुचाकी रॅली


राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी आज, बुधवारी शासकीय कर्मचारी, शिक्षकांनी सातारा येथे दुचाकी रॅली काढली. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील शेकडो शिक्षक, शासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता.

सातारा : राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी आज, बुधवारी शासकीय कर्मचारी, शिक्षकांनी सातारा येथे दुचाकी रॅली काढली. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील शेकडो शिक्षक, शासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता.
आज सकाळी सातारा येथील राजवाडा येथे असणार्‍या गांधी मैदान येथून या दुचाकी रॅलीचा प्रारंभ झाला. तेथून ही रॅली पोवई नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे येवून विसर्जित करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना आंदोलक म्हणाले, गेल्या 17 वर्षांपासून सर्वांना जुनी पेन्शन लागू व्हावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जातो आहे. परंतु या मागणीची दखल राज्य सरकारने दखल घेतलेली नाही. राज्यस्थान, छत्तीसगड व झारखंड या राज्यांतील 2005 नंतर शासन सेवेत दाखल झालेल्या कर्मचार्‍यांना एनपीएस रद्द करुन जुनी पेन्शन लागू केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील एनपीएसमधील कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अन्यथा राज्यातील 17 लाख कर्मचारी आंदोलनाची तीव्रता वाढविणार आहेत. म्हणूनच मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून बुधवारी दुचाकी रॅली काढण्यात आली.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यातील बाईक रॅलीला अपेक्षेपेक्षा अत्यंत मोठा प्रतिसाद मिळाला. यावरून जिल्ह्यातील व राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये जुनी पेन्शन या मुह्याची संवेदनशीलता लक्षात येते. सातारा येथील बाईक रॅलीमध्ये 1350 पेक्षा जास्त बाईकस्वार आपल्या एका सहकाऱ्यांसह सहभागी झाले. 2600 पेक्षा जास्त राज्य सरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सातारा शहराचा परिसर दणाणून टाकला. या बाईक रॅलीचा शासनाचा लक्षवेध करण्याचा उद्देश सफल झाला असे निश्चित म्हणता येईल. जिल्ह्याचे आकडेवारी पाहिली तर कराड येथे 850 पेक्षा जास्त, पाटण येथे 225 पेक्षा जास्त, मेढा व महाबळेश्वर येथे प्रत्येकी 200 पेक्षा जास्त, वाई येथे 400 पेक्षा जास्त, खंडाळा येथे 250 पेक्षा जास्त, फलटण येथे 550 पेक्षा जास्त, दहिवडी येथे 400 पेक्षा जास्त, खटाव येथे 450 पेक्षा जास्त व कोरेगाव येथे 350 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी या जुन्या पेन्शनच्या आजच्या बाईक रॅलीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. जिल्ह्याची एकूण आकडेवारी पाहता 6475 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
जुन्या पेन्शनसाठी अनेक आंदोलने झाली आहेत. तरीही राज्य सरकार दखल घेत नाही. म्हणूनच राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी बेमुदत संपावरही जाण्याचा निर्णय घेतला आहे. पेन्शन सामाजिक सुरक्षा म्हणून तो कर्मचार्‍यांचा हक्क आहे. त्या हक्कासाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. शासनाने कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन या संवेदनशील मागणीकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा राज्यातील कर्मचारी यापुढेही या मागणीसाठी अधिक तीव्र व नियमित आंदोलनाचा पवित्रा घेतील. बाईक रॅली यशस्वी केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानून 3 तास चाललेल्या आजच्या बाईक रॅलीची सांगता करण्यात आली.