ओढ्यांवरील अतिक्रमणांबाबत पालिका प्रशासन गांधारीच्या भूमिकेत
मुख्याधिकार्यांनी तात्काळ ही अतिक्रमणे हटविण्याची गरज
सातारा शहरात ओढ्यांवरील अतिक्रमणांच्या वाढत्या संख्येबाबत पालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीच्या भूमिकेत गेल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- विनित जवळकर
सातारा : सातारा शहरात ओढ्यांवरील अतिक्रमणांच्या वाढत्या संख्येबाबत पालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीच्या भूमिकेत गेल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा जिल्ह्याला नैसर्गिक साधनसंपत्तीचे विपुल वरदान मिळाले आहे. निसर्गाने सातारा शहरात पूर्वापार नैसर्गिक ओढे तयार केले आहेत. जिल्ह्यात तीनही ऋतु कमालीचे आपले अस्तित्व दाखवत असतात. त्यातल्या त्यात पावसाळा जास्त असल्याने जिल्ह्याच्या पश्चिम भागात भातशेती भरपूर प्रमाणात होते. सातारा शहराची भौगोलिक रचना ही उंच-सखल आहे. शहराच्या या रचनेमुळे पावसाळ्यात डोंगरांवरुन आलेले पावसाचे पाणी या ओढ्यांमार्गे नदीला जावून मिळते.
काही वर्षांपूर्वी सातारा शहरात कितीही पाऊस झाला तरी त्या पाण्याचा निचरा ओढ्यानाल्यांमुळे होवून जात असे. मात्र यानंतर काही धनदांडग्यांनी या ओढ्या-नाल्यांवरच अतिक्रमणे करुन निसर्गालाच आव्हान दिले. परिणामी पावसाळ्यात डोंगरावरुन आलेले पाणी अडले जावून ते पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरायला लागते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान प्रत्येक पावसाळ्यात होत असते. आता तर परिस्थिती अशी आहे की काही भागांमधील नागरिकांना पावसाळ्याचीच धास्ती वाटत असते. याबाबत अनेकदा प्रसारमाध्यमांनी आवाज उठवला असला तरी पालिका प्रशासन मात्र कोणाच्या तरी दबावाखाली नेहमीच दबलेले पहावयास मिळाले आहे. कोणाही माई च्या लाल ने ओढ्यावरील अतिक्रमणे जमिनदोस्त करायचा प्रयत्न काही पहायला मिळालेला नाही. त्यामुळे निर्ढावलेले हे धनदांडगे आणखीनच शेफारले आहेत. काहीजणांवर तर जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकार्यांसह एका समाजसेवकाचीही कृपादृष्टी असल्याचे ऐकिवात आहे, तर काहीजणांवर काही संघटना मेहरबान असल्याचे बोलले जात आहे.
सातारा शहरातील नवीन आरटीओ ऑफिसच्या चौकात असणारे चहाचे हॉटेल, शेजारी कुशनचे दुकान आणि त्या लगत असणारे चिकन सेंटर पूर्णत: ओढ्यावर वसलेले आहे. त्याचप्रमाणे राधिका रस्त्यावर असणार्या गंमत जंमत आणि सिटी वाईन्स शेजारी असणारी दोन्ही हॉटेल्स ओढ्यावर ताठ मानेने उभी राहून सातारा पालिकेच्या भ्रष्ट कारभाराला वाकुल्या दाखवित उभी आहेत. यासंदर्भात ‘साहस वार्ता’ने जागत्याची भूमिका घेत निर्भिड वार्तांकनही केले होते. मात्र, गेंड्याची कातडी पांघरलेल्या सातारा पालिका प्रशासनाला ही अतिक्रमणे दाखवूनही दिसली नाहीत, याचेच वैशम्य वाटते. याच राधिका रस्त्यावर ओढ्याच्या शेजारी असणार्या रस्त्यावर एका फळवाल्याने आणि एका टायरवाल्याने मजबुत गेट बांधत त्या गेटलाच चांगली कुलूपे लावून रस्तेच बळकावले आहेत. याबाबतही पालिका प्रशासन आजपावेतो ढिम्मच आहे. या अगोदर काही नगरसेवकांच्या मध्यस्थींमुळे पालिका प्रशासनाला अतिक्रमणांवर कारवाई करण्यामध्ये अडथळा होत असे. मात्र, आता प्रशासनिक कारभार असताना पालिकेचे मुख्याधिकारी याबाबत कठोर कारवाई करणार का? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.


