maharashtra

फलटण तालुक्यात वाळु तस्करांवर मोठी कारवाई

१० लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Major action against sand smugglers in Phaltan taluka
फलटण तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांवर मोठी कारवाई करत सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडून १० लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी प्रशांत सतीश भिसे वय १९, महेश उर्फ अक्षय विकास गायकवाड वय २६, आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेची नवीन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई समजली जाते.

फलटण : फलटण तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांवर मोठी कारवाई करत सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडून १० लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी प्रशांत सतीश भिसे वय १९, महेश उर्फ अक्षय विकास गायकवाड वय २६, आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेची नवीन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई समजली जाते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने किशोर धुमाळ यांनी एक पथक गठित केले होते.
दि. १ फेब्रुवारी २०२२ रोजी किशोर धुमाळ यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही इसम निंभोरे ते मिरगाव जाणाऱ्या मार्गावरून डंपरमधुन वाळूची बेकायदेशीर चोरटी वाहतूक करणार आहेत.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने दि. फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास निंभोरे ते मिरगाव जाणाऱ्या मार्गावर पालखी विसावा जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला. काही वेळातच त्या मार्गावरून एक डंपर व आल्टो कारच्या माध्यमातून अवैध वाळू वाहतूक करत असल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन डंपर आल्टो कार व तीन ब्रास वाळू असा एकूण १० लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार दबडे, कर्मचारी विश्वनाथ संकपाळ, राजकुमार ननावरे, संतोष पवार, अमोल माने, अर्जुन शिरतोडे, स्वप्निल माने, शिवाजी भिसे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, प्रवीण पवार, केतन शिंदे, मोहसिन मोमिन, मयूर देशमुख यांनी सहभाग घेतला.