रिपाई महिला आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन
बंदिस्त कॅफे बंद करण्याची करण्यात आली मागणी
सातारा शहरातील बंदिस्त स्वरूपाची कॅफे हे तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सातारा : सातारा शहरातील बंदिस्त स्वरूपाची कॅफे हे तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात महिला आघाडीच्या अध्यक्ष पूजा बनसोडे, स्वाती गायकवाड, संगीता शिंदे, यांच्यासह त्यांच्या महिला सहकारी सहभागी झाल्या होत्या. रिपाई महिला आघाडीच्या वतीने यापूर्वीच जिल्हाधिकारी यांना बंदिस्त कॅफे तत्काळ बंद करावेत याकरिता निवेदन देण्यात आले होते. वाई येथे बंदिस्त कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही पूरती आक्रमक झाली आहे. जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला आंदोलकांनी ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. बंदिस्त कॅफे तात्काळ बंद झालेच पाहिजेत, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
बंदिस्त कॅफे संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही यामध्ये प्रशासनाची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. हे बंदिस्त कॅफे तात्काळ बंद करण्यात यावेत. अन्यथा रिपाई या बंदिस्त कॅफेचा आपल्या पद्धतीने बंदोबस्त करेल. त्यावेळी होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या जबाबदारीला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा जोरदार इशारा पूजा बनसोडे यांनी दिला आहे.


