maharashtra

आज उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

तालीम संघ मैदानावर रंगणार उंचीचा थरार

खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने येथील तालीम संघ मैदानावर आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी स्पर्धेसाठी भरघोस रोख रकमांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती मित्र समूहाच्या वतीने सुनिल काटकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने येथील तालीम संघ मैदानावर आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी स्पर्धेसाठी भरघोस रोख रकमांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती मित्र समूहाच्या वतीने सुनिल काटकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे.
पत्रकार परिषदेत काटकर म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रेरणेमुळेच दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्याचा पायंडा साताऱ्यात सुरू झाला आहे. दोन-तीन वर्षाच्या कालखंडानंतर यंदा प्रथमच दहीहंडी उत्सव होत असून दहीहंडीच्या थरांचा थरार पाहण्याची सुसंधी तालीम संघाच्या मैदानावर सातारकरांना उपलब्ध होणार आहे.
प्रथम क्रमांकाच्या गोविंदा पथकाला एक लाख 77 हजार 777 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. जे गोविंदा पथक चार थरापेक्षा जास्त थर लावण्यात यशस्वी होतील परंतु जे दहीहंडी फोडण्यात यशस्वी होणार नाहीत अशा गोविंदा मंडळांना देखील प्रत्येकी पाच हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे. ही बक्षिस हे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते समारंभपूर्वक दिली जाणार आहेत. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तालीम संघाच्या विस्तीर्ण मैदानावर अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था, उच्च दर्जाची साऊंड सिस्टिम, मोठे स्टेज उभारण्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात असून मित्र समूहाच्या वतीने या कामांची नुकतीच पाहणी करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले हे संपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील कोणत्याही गोविंदा मंडळाला कोणतेही शुल्क न देता या गोविंदा पथकात भाग घेता येणार आहे. ठाणे, मुंबई येथील गोविंदा पथकांसह जिल्ह्यातील प्रसिद्ध गोविंदा मंडळांना या स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून सातारकरांना रविवारी सुट्टीच्या दिवशी दहीहंडी निमित्त गोविंद पथकांचा थरार पाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने सातारकरांनी तालीम संघ मैदानावर उपस्थित रहावे, असे आवाहन मित्र समूहाच्या वतीने सुनील काटकर, पंकज चव्हाण, गोलू साळुंखे, एडवोकेट विनीत पाटील, प्रीतम कळसकर आदींनी केले आहे.