maharashtra

तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन एकास मारहाण


पिंपरद, ता. फलटण येथे तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन एकास सहाजणांनी मारहाण केल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : पिंपरद, ता. फलटण येथे तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन एकास सहाजणांनी मारहाण केल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास पिंपरद, ता. फलटण येथील विशाल शंकर पवार यांना त्यांनी पोलीस ठाण्यात याआधी दिलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन आकाश भरत आडके, समाधान धनाजी चव्हाण, प्रकाश आडके, सागर प्रकाश आडके, रवींद्र कुंडलिक आडके आणि किसन आडके यांनी लोखंडी सळई, कोयता आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही दिली. झालेल्या मारहाणीमुळे विशाल पवार हे बेशुद्ध पडल्यानंतर हे सहा हल्लेखोर तेथून निघून गेले. पवार यांच्यावर फलटण आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर पवार यांना अधिक उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आले. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.