सातारा येथे तीन ट्रक पॅकपीस दिव्यांग व्हील चेअर भंगारात
पोलीस अधीक्षकांकडे चौकशीची मागणी
सातारा येथील मोळाचा ओढा परिसरात असणाऱ्या एका भंगाराच्या दुकानात तीन ट्रक पॅकपीस व्हील चेअर भंगारात आल्याची माहिती समजताच आज शहर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, दिव्यांग बांधवांनी पोलीस अधीक्षक अजय बंन्सल यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सातारा : सातारा येथील मोळाचा ओढा परिसरात असणाऱ्या एका भंगाराच्या दुकानात तीन ट्रक पॅकपीस व्हील चेअर भंगारात आल्याची माहिती समजताच आज शहर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, दिव्यांग बांधवांनी पोलीस अधीक्षक अजय बंन्सल यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सातारा येथील मोळाचा ओढा परिसरात असणाऱ्या शहीद संतोष महाडिक पोलीस चौकी नजीक असणाऱ्या एका भंगाराच्या दुकानात तीन ट्रक पॅकपीस व्हील चेअर भंगारात देण्यात आल्याची माहिती आज सातारा शहर व परिसरातील दिव्यांग बांधवांना समजताच त्यांच्यातून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे सातारा शहरातील दिव्यांग बांधवांना या व्हील चेअरचे वाटप न करता त्या भंगारच्या दुकानात का देण्यात आल्या? त्या कोणत्या शासकीय विभागातून त्या ठिकाणी पाठवण्यात आल्या? का अन्य कोणत्या ठिकाणावरून पाठवण्यात आल्या? याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला असून आज दुपारी दिव्यांग बांधवांनी पोलीस अधीक्षक अजय बंन्सल यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. बंन्सल यांनीही या मागणीची गंभीरपणे दखल घेतली आहे. अजय बंन्सल यांची भेट घेतल्यानंतर दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.


