maharashtra

महागावनजीक ऊस तोड कामगाराचा कॅनॉलमध्ये पडून मृत्यू


Sugarcane harvester dies after falling into canal near Mahagaon
महागाव, ता. सातारानजीक ऊस तोड कामगाराचा कॅनॉलमध्ये पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे ऊसतोड कामगारांमधुन हळहळ व्यक्त होत आहे.

सातारा : महागाव, ता. सातारानजीक ऊस तोड कामगाराचा कॅनॉलमध्ये पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे ऊसतोड कामगारांमधुन हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संतोष हिरामण पाजगे, वय ४५, रा. यावल पिंपरी, ता. घनसंगी,  जि. जालना  हे पत्नी मीराबाई आणि नितीन आणि सोन्या या दोन मुलांसमवेत दरवर्षी सातारा जिल्ह्यामध्ये ऊस तोड करण्यासाठी टोळीच्या माध्यमातून येतात.  तीन महिन्यापूर्वी हे कुटुंब महागाव, ता. सातारा गावच्या हद्दीत परिसरातील ऊसतोड करण्यासाठी दाखल झाले होते. ते ज्या ठिकाणी वास्तव्य करतात त्याच्या नजीक पाण्याने प्रवाहित होत असलेला कॅनॉल आहे. गुरुवार दि. २३ फेब्रुवारी रोजी ऊस तोडीचे काम संपल्यानंतर ते शेतातुन दुपारी घरी आले. त्यानंतर संतोष पाजगे हे कॅनॉलमध्ये हातपाय धुण्यासाठी गेले असता त्यांचा तोल जाऊन ते कॅनॉलमध्ये पडले.  बराच वेळ ते खोपटाकडे न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली मात्र ते सापडले नाहीत. गुरुवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह चिंचणेर, ता. सातारा गावच्या हद्दीत कॅनॉलमध्ये आढळून आला. यावेळी पाजगे कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. काल रात्री त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी नेण्यात आला. आज दुपारी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.