हेवेदावे बाजूला ठेवून कामाचे परिणाम दाखवा
साताऱ्यातील शिवसंपर्क अभियान मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
शिवसैनिकांनी आपापसात कोणतेही हेवेदावे न ठेवता चांगल्या कामांना परिणाम द्यावेत काम करूया आणि कामाचे रिझल्ट येऊ द्या, असे आवाहन कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.
सातारा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत चांगली कामगिरी करत आहे. ती कामगिरी जबाबदारीने पार पाडण्याचे आपण सर्व शिवसैनिकांचे कर्तव्य आहे. हे काम एकीच्या माध्यमातूनच होणार आहे. शिवसैनिकांनी आपापसात कोणतेही हेवेदावे न ठेवता चांगल्या कामांना परिणाम द्यावेत काम करूया आणि कामाचे रिझल्ट येऊ द्या, असे आवाहन कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील संपर्क अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या अंतर्गत शुक्रवारी सातारा शहरात संवाद मेळाव्यांना सुरुवात झाली रामाचा गोट येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात खासदार शिंदे यांनी शहरातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हाप्रमुख हणमंत चवरे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शारदा जाधव, जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, शहर प्रमुख निलेश मोरे, उपशहर प्रमुख गणेश अहिवळे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
खासदार श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, राज्यामध्ये महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षात अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. सर्वसामान्यांचा विकास योजना तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचवण्यामध्ये सर्वांचे जबाबदारीचे काम असून त्या पद्धतीने शिवसैनिकांनी आपली भूमिका पार पाडायला हवी. जो काम करतो त्याच्याच पाठीशी लोक राहतात. त्यामुळे लोकांच्या मदतीसाठी सदैव तयार रहा. शिवसैनिकांनी कोणतीही हेवेदावे न ठेवता सामूहिकरीत्या कामांना परिणाम द्यावेत. सातारा जिल्ह्यातील लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवून त्यांना आधार देणे गरजेचे आहे. राज्यात आपले सरकार असल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांना कामाची मोठी संधी उपलब्ध आहे. चांगल्या कामांसाठी आम्ही नेहमीच आपल्या पाठीशी आहोत. कामाचे रिझल्ट दिले तर लोकाश्रय मिळायला अडचण येत नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील म्हणाले, आपण पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करू त्याच वेळी पक्ष आपल्या अपेक्षा पूर्ण करेल. पडत्या काळात पक्षाला ज्यांनी ताकद दिली त्यांच्यावर अन्याय होणार नाही. पण ज्या ठिकाणी आपल्याकडून काम होत नाही त्या ठिकाणी नव्या दमाच्या लोकांकडे धुरा सोपवली गेली पाहिजे. त्यामुळे पक्षाचे नुकसान होणार नाही हे पाहणे कट्टर शिवसैनिकांची काम आहे. नवीन माणसे पक्षात येणार नाहीत तोपर्यंत पक्ष वाढणार नाही. त्यामुळे नवीन नवीन माणसांना सामावून घेण्याची गरज आहे.


