maharashtra

महाराष्ट्रामध्ये बेताल बडबड करणाऱ्यांची संख्या वाढली आहे

शिक्षण मंत्री दीपक केसकर यांची साताऱ्यात टीका

आज महाराष्ट्रात जी भाषा वापरली जाते, ती कोणत्या दर्जाची आहे याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे देश आणि परदेशात महाराष्ट्राबाबत कोणते चित्र जाते याचाही विचार झाला पाहिजे.

सातारा : आज महाराष्ट्रात जी भाषा वापरली जाते, ती कोणत्या दर्जाची आहे याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे देश आणि परदेशात महाराष्ट्राबाबत कोणते चित्र जाते याचाही विचार झाला पाहिजे. एकीकडे महाराष्ट्रात गुंतवणूक केली जात नाही असे म्हटले जाते. मात्र ज्या राज्यात इ डिसेंन्ट माणसे असतात, त्या राज्यात कोणता देश गुंतवणूक करणार असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्रात वाचाळवीर म्हणून एक नवीन संस्कृती उदयास येऊ लागली आहे, असा आरोप आज शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सातारा येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला.
ना. दीपक केसरकर यांनी आज सातारा येथे जलमंदिर पॅलेसला भेट देऊन राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी पाटण येथे आ. भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर केलेल्या आरोपांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
 ना. दीपक केसरकर पुढे म्हणाले, बोलणारा काहीही बोलू शकतो मात्र जीप दिली म्हणून काहीही बोलण्यात अर्थ नाही. जेव्हा एखाद्याला जनता आमदार म्हणून निवडून देते, तेव्हा त्यांनी जनतेसाठी काहीतरी केलेले असते. आज जी भाषा वापरली जाते ती कोणत्या दर्जाची आहे याचा विचार केला गेला पाहिजे. आदरपूर्वक भाषा आणि आदरातिथ्य हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. छोट्याशा मुलालाही महाराष्ट्रात अहो म्हटले जाते हीच आपली संस्कृती आहे. आज जी भाषा वापरली जाते त्याबाबत महाराष्ट्राबाबत त्यामुळे देश आणि परदेशात कोणते चित्र जात असावे याचा कधी विचार होणार आहे का नाही? महाराष्ट्रात गुंतवणूक होत नाही असा आरोप केला जातो मात्र ज्या राज्यात इ डिसेंन्ट बोलणारी माणसे असतात त्या राज्यात कोणता देश गुंतवणूक करणार आहे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
 आपल्याला निरंतर सत्ता मिळू शकते हा भ्रम उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दूर झाला आहे. शिवसेना - भाजपची  हिंदुत्ववादी विचार प्रणाली अशा स्वरूपाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने शिवसेना मोठी झाली मात्र त्या विचारापासून शिवसेना लांब गेली. शिवसेनेची महाराष्ट्रातील सत्ता गेली असली तरी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता आहे, असेही ना. दीपक केसरकर यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसांना कोणी स्टॅम्प पेपरवर लिहून मागितले तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार कोणाला राहतो असा प्रश्न उपस्थित करत ते पुढे म्हणाले, आज मी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर करवीर संस्थांचे अधिपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा आज अमृतमहोत्सवी ७५ वा वाढदिवस असून त्यांची मी आजच भेट घेणार आहे. शेवटी मनात श्रद्धा असावी लागते, मनापासून आदर करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करायचा मात्र त्यांच्या वारसांना मान न देता तो आपल्याकडेच आहे, असे भासवण्याचे राजकारणात नवीन पीक येत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील एक विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रात पहिली आली हा जिल्हासह कोल्हापूर विभागाचा बहुमान आहे, असे सांगत शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्यावर सराव करावा लागू नये याकरता जागा उपलब्ध करण्याबाबत चाचपणी सुरू असून जागेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आ. योगेश कदम यांच्या गाडीला झालेल्या अपघाताची चौकशी करण्यात येईल सध्या ते सुखरूप आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तेच ठरवणार का?
उद्धव ठाकरे शिवसेना गटातील काहीजण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सातत्याने भाष्य करत असल्याचे म्हटले आहे त्यावर ना. दीपक केसरकर म्हणाले, आम्ही सांगेल तेच होणार असेच आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला वाटत होते. जमिनीवर त्यांचे पाय राहिले नसल्यामुळे जनता त्यांच्याबरोबर राहिली नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ते ठरवणार का? निर्णय न्यायाधीश घेतील असे सांगून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तावडीतून शिवसेनेला आम्ही सोडवून आणले याचे त्यांना काही एक देणे-घेणे नाही, असा आरोपही त्यांनी केला.