maharashtra

अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सावत्र बापाला सक्तमजुरी


Hard labour for step-father for torturing a minor step-daughter
अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सावत्र बापाला पॉक्सो अंतर्गत न्यायालयाने १० वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास एक वर्ष साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

सातारा : अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सावत्र बापाला पॉक्सो अंतर्गत न्यायालयाने १० वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास एक वर्ष साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
आझम आझीज उर्फ कासम शेख, वय ४८, रा. कुरेशीनगर, फलटण, ता. फलटण असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आझम आझीज उर्फ कासम शेख याने दि. ४ सप्टेंबर २०१७ ते दि. १४ सप्टेंबर २०१७ दरम्यान वेळोवेळी राहत्या घरी अल्पवयीन सावत्र मुलीला तिची आई व लहान बहिणीस मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. याबाबतची तक्रार पीडित मुलीने दि. १६ सप्टेंबर २०१७ रोजी दिल्यानंतर त्या दिवशी पोलिसांनी सावत्र बापावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.  याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. एस. बोंबले यांनी तपास करून न्यायालयात त्याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला सातारा येथील न्यायालयात विशेष न्यायाधीश ए. के. पटणी यांच्यासमोर सुरू होता. या खटल्यात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले.
परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांच्या साक्षीवरुन न्यायाधीश ए. के. पटणी यांनी आझम आझीज उर्फ कासम शेख याला न्यायालयाने पॉक्सो अंतर्गत १० वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास एक वर्ष साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. महेश कुलकर्णी यांनी सरकारी वकील म्हणून तर पैरवी अधिकारी फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांनी कामकाज पाहिले. त्यांना सातारा न्यायालयातील पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव, पोलीस हवालदार शमशुद्दीन शेख, जी. एस. फरांदे, पो. कॉ. राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी सहकार्य केले.