आस्था बेघर निवारा केंद्रात महिला दिन नाविण्यपूर्ण उपक्रमाने साजरा
तृतीयपंथी व रेड लाइट एरिया मधील भगिनींचा सत्कार करून केला महिला दिन साजरा
गुरुनाथ चॅरीटेबल ट्रस्ट व नगरपालिका संचलित आस्था बेघर निवारा केंद्र येथे दिनांक 10 मार्च रोजी सावित्रीमाई फुले यांची पुण्यतिथी व महिला दिन तृतीयपंथी व रेड लाइट एरिया मधील भगिनींचा सत्कार करून साजरा करण्यात आला.
सातारा : गुरुनाथ चॅरीटेबल ट्रस्ट व नगरपालिका संचलित आस्था बेघर निवारा केंद्र येथे दिनांक 10 मार्च रोजी सावित्रीमाई फुले यांची पुण्यतिथी व महिला दिन तृतीयपंथी व रेड लाइट एरिया मधील भगिनींचा सत्कार करून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी गुरुनाथ चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष कौशिक कुलकर्णी, सचिव अभिषेक कुलकर्णी, आस्था बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक शिवम इंगळे, नगरपालिकेच्या सौ. कीर्ती साळुंखे, दिवेकर, आरती जोशी, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा सेवा संघाचे सातारा शहराध्यक्ष गौरव पवार तसेच छत्रपती शिवाजी कॉलेजचे डॉ. गावडे, मोरे व समाजशास्त्र विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
आजच्या घडीला महिला दिन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून सेलिब्रिटींपासून ते आमदार-खासदारांच्या उपस्थितीत साजरा करण्याची नवीन पद्धत रुढ होत आहे. मात्र त्याला तिलांजली देत समाजातील आदर्शवत असणार्या मान्यवरांच्या उपस्थितीत समाजापासून वंचित असणारा समाजाच्या नजरेत दुर्लक्षित असणारा समाज म्हणजेच तृतीयपंथी आणि वारांगणांच्या सत्काराने मोठ्या उत्साहात आस्था बेघर निवारा केंद्रात महिला दिन साजरा करण्यात आला. आस्था बेघर निवारा केंद्राच्या या उपक्रमाने समाजात एक आदर्श संदेश दिला गेला आहे.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या सौ. कीर्ती साळुंखे यांनी उपस्थितांना चांगले मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे तृतीयपंथी आरती ताई रोहिणी ताई यांनी नक्की तृतीयपंथी काय असतो व त्यांच्या समस्या, वेदना आणि समाजातून त्यांना येणारा अनुभव विषद केला. त्या म्हणाल्या, आम्हाला समाजाकडून फक्त प्रेमाची आपुलकीची व आपलेपणाची साथ हवी आहे ही भावना त्यांनी मांडली. आम्हा तृतीय पंथीयांना शिक्षणासाठी व नोकरीकरिता तुम्ही संधी द्या. आम्ही नक्कीच त्याचे सोनं करू. त्याचप्रमाणे अंजनाताई घाडगे यांनी वारांगणा म्हणजे काय व त्यांच्यावर येणार्या अडचणी व जीवन अनुभव उपस्थितांपुढे मांडला. समाजामध्ये जर वारांगणा महिलाच जर नसत्या तर बलात्काराचे प्रमाण खूप वाढले असते. समाजाचे संतुलन ठेवण्याचे काम आमच्याकडून होत आहे. पण तरी देखील आमच्याकडे समाज हा घाण नजरेने बघतो. असे का घडते? असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमातून विचारांची देवाण-घेवाण करण्यात आली. युवकांनी अशा विषयांवर चर्चा करून समाजात काही बदल करावे व काही बदल देखील करू असे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा समाजशास्त्र विभागाचे डॉ. गावडे यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सत्कार मूर्तींना छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आस्था बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक शिवम विष्णू इंगळे यांनी केले व सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.


