वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 12 लाख 66 हजाराचा दंड वसूल
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांची माहिती
मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 2091 वाहनांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून 12 लाख 66 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे, अशी माहिती साताऱ्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
सातारा : मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 2091 वाहनांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून 12 लाख 66 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे, अशी माहिती साताऱ्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. ही मोहिम 1 मार्च ते 15 मार्च या दरम्यानं राबविण्यात आली.
परिवहन आयुक्तांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मुंबईत उच्चस्तरीय कमिटीची एक बैठक नुकतीच पार पाडली. पुणे-बेंगलोर महामार्गावर गतवर्षीच्या तुलनेत यंदा सातारा जिल्ह्याच्या हद्दीत वारंवार अपघात होत असल्याची गंभीर बाब नोंदवण्यात आली होती. चार पथकांच्या माध्यमातून आणि आनेवाडी टोल नाका, खंडाळा टोल नाका परिसर तसेच दोन फिरत्या पथकांच्या माध्यमातून संभाव्य अपघात क्षेत्राच्या ठिकाणी भेटी देऊन वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये विना हेल्मेट 754, वाहन चालविताना मोबाईलचा वापर 213, अति वेगाने वाहन चालणारी वाहने 490, सीट बेल्ट नसणे 215, चुकीच्या लेन मधून चालणारी वाहने 32, धोकादायक पार्किंग 169, विमा नसलेली वाहने 138, पियूसी नसलेली वाहने 63, योग्य प्रमाणपत्र नूतनीकरण नसलेली वाहने 65, रिफ्लेक्टर टेलर गाडीला नसणे 20, अशा वेगवेगळ्या कलमा खाली केसेस करुन सुमारे 2091 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण 12 लाख 66 हजार 750 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. खंडाळा टोल नाका तसेच आनेवाडी टोल नाका येथे दोन स्थायी पथके तैनात करण्यात आली असून दोन पथके फिरती ठेवण्यात आलेली आहेत. या पथकामार्फत रस्ता सुरक्षा दृष्टीने हेल्मेट, सीट बेल्ट, अतिवेग, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, रॅश ड्रायव्हिंग इत्यादी नियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच फिरत्या पथकांच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना मदत करणे, अपघात स्थळाला तातडीने भेट देणे, सदर ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना राबवणे इत्यादी जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या आहेत. दुचाकी वाहनांचे पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण 51 टक्के असून चारचाकी वाहनांचे चोवीस टक्के प्रमाण आहे. त्यासाठी चारचाकी वाहन चालकांनी सीट बेल्ट सक्तीने वापरणे तसेच टू व्हीलर चालकाने हेल्मेट वापरणे गरजेचे असून ते न वापरल्यास तत्काळ दंड केला जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिला आहे.
या मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक संदीप भोसले, योगेश ओतारी, मारुतीराव पाटील, विनायक सूर्यवंशी, संग्राम देवणे, सुजित दंडेल, पूजा लोखंडे, प्रसाद सुरवसे, मोनिका साळुंखे, शिवदिनी लाड, राजेंद्र दराडे यांनी सहभाग घेतला होता.


