maharashtra

गोलबाग गोळीबार प्रकरणातील आणखी दोन संशयितांना अटक

सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई

साताऱ्यातील मध्यवस्तीत असलेल्या गोलबाग येथील गोळीबार प्रकरणातील आणखी दोन संशयितांना जेरबंद करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे.

सातारा : साताऱ्यातील मध्यवस्तीत असलेल्या गोलबाग येथील गोळीबार प्रकरणातील आणखी दोन संशयितांना जेरबंद करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दीपक उर्फ आप्पा बबनराव मांढरे हे त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी गोलबाग येथे गेले असताना 20 ते 25 वयोगटातील अज्ञात इसम तेथे आले व त्यामधील एकाने त्याच्याकडील पिस्तुरातून मांढरे यांच्यावर बेछुट गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मांढरे हे गंभीर जखमी झाले असून याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये यापूर्वी गोळीबार करणाऱ्या एकास व दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन एकाकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्टल हस्तगत करून पुढील कारवाई करता शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले होते. यानंतर या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार याच्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. या तपासामध्ये मुख्य सूत्रधार ऋषभ जाधव यांच्याकडे तीन पिस्टल असल्याबाबत खात्रीलायक माहिती प्राप्त झाली होती. त्याचप्रमाणे सुयोग कदम याच्याकडे एक पिस्टल असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी कदम याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्टल हस्तगत करण्यात आले होते.
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार ऋषभ जाधव व त्याचा साथीदार चंद्रकुमार निगडे यांना शाहूपुरी पोलिसांच्या तपास पथकाने पुणे येथून 24 डिसेंबर रोजी ताब्यात घेऊन अटक केली आहे. या गुन्ह्याच्या समांतर तपास दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या विशेष तपास पथकास या गुन्ह्यातील ऋषभ जाधव याने एक पिस्टल चंद्रकुमार निगडे याच्या मदतीने लपवून ठेवले असल्याची माहिती दिल्याने दिनांक 26 डिसेंबर रोजी गुन्ह्यात वापरलेले पंचवीस हजार रुपये किमतीचे पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे.
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे, बने, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विजय कांबळे, अतिश घाडगे, संदीप शेळके, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अमित माने, ओंकार यादव, स्वप्नील कुंभार, स्वप्निल पवार यांनी सहभाग घेतला.