maharashtra

भारतीय मजदूर संघाची साताऱ्यात निदर्शने


Indian trade union protests in Satara
राज्यात प्रचंड वाढलेल्या महागाईच्या विरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघाने सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवले.

सातारा : राज्यात प्रचंड वाढलेल्या महागाईच्या विरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघाने सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवले.
निवेदनात म्हटले आहे, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश कार्य समितीची बैठक नाशिक येथे नुकतीच झाली. त्यामध्ये महाराष्ट्रात वाढत चाललेल्या महागाईबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली असून महागाईकडे सरकारने संवेदनशीलपणे पाहून त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात असा ठराव या बैठकीत घेण्यात आला. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम अन्य वस्तूंच्या खर्चावर झाला असून त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्य, डाळी, गहू-तांदूळ यांच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या किमतीमध्येही ४० टक्के वाढ झाली आहे.  महाराष्ट्रात एकूण ४.५ कोटी कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात या कामगारांचे उत्पन्न अत्यंत कमी असून रोजगारामध्ये अनियमितता असते.  या कमगारांचा अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूवरील खर्च त्यांच्या एकूण पगाराच्या ५० टक्के पर्यंत असतो मात्र तो आता ६० ते ७० टक्केच्यापुढे गेला आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने महागाईवर विविध उपाययोजना करून त्वरित आळा घालावा, पेट्रोलियम पदार्थाच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणाव्यात, खासगी वाहतुकीच्या प्रवास भाड्यावर निर्बंध आणावेत, खाद्यतेल, डाळी, भाजीपाला आणि अन्नधान्य यांच्या किमती‌ नियंत्रणात ठेवाव्यात अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.