maharashtra

वर्धनगड घाटातील पुलाच्या बांधकामाचे अर्धवट अवस्थेतील काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी


Demand for immediate completion of partial construction of bridge in Vardhangad Ghat
वर्धनगड घाटातील रामोशी वाडी कडून दोन नंबर पुलाचे काम गेली चार महिने पूर्ण होऊन देखील त्या पुलाच्या  रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. पुलाच्या बाजूने काढून दिलेला रस्ता पूर्णपणे खडतर झाला असून आणि चढ उताराचा असल्याने या ठिकाणी उसाचे ट्रॅक्टर-ट्रॉली चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी मोठी ताकद लागत असल्याने त्या रस्त्यावरच बंद पडतात!

खटाव : वर्धनगड घाटातील रामोशी वाडी कडून दोन नंबर पुलाचे काम गेली चार महिने पूर्ण होऊन देखील त्या पुलाच्या  रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. पुलाच्या बाजूने काढून दिलेला रस्ता पूर्णपणे खडतर झाला असून आणि चढ उताराचा असल्याने या ठिकाणी उसाचे ट्रॅक्टर-ट्रॉली चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी मोठी ताकद लागत असल्याने त्या रस्त्यावरच बंद पडतात! त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण होत असून, या ठिकाणी पूर्ण मुरमाचा रोड असल्याने धुळीचे लोट तयार होतात! याचा त्रास दुचाकीसह सर्वच वाहनधारकांना होत आहे. या ञासाला कंटाळून नागरिकांनी व वाहनधारकांनी घाटातील अर्धवट राहीलेल्या पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे.
तसेच या ठिकाणी रस्ता उघडा पडल्याने सर्व दगड वर आले आहेत. त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिणामतः या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही! थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घसरण होत असते. यापूर्वी अनेक दुचाकीस्वार घसरून पडले आहेत. या ठिकाणी राहत असणारा कामगार वर्ग तोही आपला बोरा विस्तारा गुंडाळून निघून गेला आहे. त्यावेळेपासून या रस्त्याचे काम बंद पडले आहे. या सातारा-लातूर रस्त्याच्या पुलाच्या कामासाठी वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर असल्याने निश्चित याबाबतीत विचारणार कोणाला? असा प्रश्न निर्माण होत आहे. रस्ते बांधकाम विभागाने याबाबत चौकशी करून या पुलाचे काम त्वरित मार्गी लावण्याची मागणी अनेक वाहनधारक व परिसरातील नागरिकांनी केली आहे.