दहिवडी-फलटण रस्त्यावर असलेल्या बालाजी पेट्रोल पंपावर रात्री दहाच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत एकवीस हजाराची रोकड लंपास केली.
गोंदवले : दहिवडी-फलटण रस्त्यावर असलेल्या बालाजी पेट्रोल पंपावर रात्री दहाच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत एकवीस हजाराची रोकड लंपास केली.
बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रात्रपाळीसाठी कामाला असलेले पेट्रोल पंप कर्मचारी यांच्या जवळ सुझुकी यामाहा कंपनीची एफ झेड मोटार सायकल घेऊन तीन अज्ञात युवक पेट्रोल भरण्याचे सोंग करून कर्मचाऱ्या जवळ गेले. सदर अज्ञात तीन चोरट्यांनी कर्मचार्याच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून घेऊन पळ काढला. कर्मचाऱ्याने धावत थोडाफार पाटलाग केला. आणि गाडीचा नंबर लिहून घेण्याचा प्रयत्न केला मात्र गाडीची नंबर प्लेट व्यवस्थित दिसत नसल्याने गाडीचा नंबर माहिती करता आला नाही. सदर तीन चोरट्याने तोंड बांधले असल्यामुळे चेहरेही व्यवस्थित पाहता आले नाहीत. अशी माहिती पेट्रोल पंपाचे मालक उदयसिंह सुभाष जगदाळे दहिवडी ता. माण जि. सातारा यांनी दहिवडी पोलिस ठाण्याला दिली.
दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संतोष तासगावकर यांनी घटनास्थळी ताबडतोब जाऊन घडलेल्या घटनेची चौकशी करून गुन्हा दाखल केला व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीस सुरुवात केली.
सदर अज्ञात तीन चोरटे हे बऱ्याच दिवसापासून दहिवडी परिसरामध्ये फिरत आहेत. दहिवडी परिसरामध्ये गेल्या दोन महिन्यापासून ज्या चोर्या होत आहेत. त्यामध्ये देखील या अज्ञात चोरट्यांचा हात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे तिघेजण चोरटे प्रत्येक वेळेस नवीन मोटरसायकल बदलत असतात. या त्रिमूर्तींनी या अगोदर दहिवडीत बऱ्याच नागरिकांनी पाहिले होते. रात्री चोरी केलेले हे तिघे तर नसतील ना अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.


