maharashtra

सहज योग परिवाराच्या वतीने मंगळवारी आत्मसाक्षात्कार योग कार्यक्रम


परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहज योग परिवाराद्वारे संगीत, आत्मसाक्षात्कार व ध्यानाचा कार्यक्रम ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ग्रीस, भारत व मलेशिया या देशांतील ३० कलाकारांतर्फे मंगळवारी, दि. ४ रोजी सायंकाळी ७ वा सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात आयोजित केला आहे.

सातारा : परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहज योग परिवाराद्वारे संगीत, आत्मसाक्षात्कार व ध्यानाचा कार्यक्रम ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ग्रीस, भारत व मलेशिया या देशांतील ३० कलाकारांतर्फे मंगळवारी, दि. ४ रोजी सायंकाळी ७ वा सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात आयोजित केला आहे.
सहज योग परिवारातील प्रदीप सोळसकर (मुंबई), प्रसाद देसाई (ऑस्ट्रेलिया), जॉन मीटजान्स (इटली), इलेना पॉली (इटली), ॲन्ड्रे गीनडीन (इस्त्रायल), प्रकाश मुजुमदार (सातारा) यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
ऑस्ट्रेलियाचे जॉन स्माइली (मुख्य गायक) आणि समूहातर्फे मराठी, हिंदी भाषेमधून भक्ती गीते आणि कव्वाली सादर केली जाईल. गणेश स्तुति, शिव स्तुति, जोगवा अशा रचना सादर केल्या जाणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्यात नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, जांबुत (संगमनेर) आणि पुणे येथे कार्यक्रमात हजारो साधकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे. परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी १५० हून अधिक देशांमध्ये स्वत: जाऊन आत्मज्ञानाचे कार्यक्रम विनामूल्य राबविले आहेत. भारतीय संस्कृती व परंपरा विदेशात रुजवली आहे व याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतो.
सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात माणसाला शांतीची खूपच आवश्यकता आहे. सर्व प्रकारच्या ताणतणावातून आपण जात असतो, तर या सर्व प्रकारच्या ताणतणाव व अशांतीपासून मुक्त होण्याचा हा विनामूल्य आध्यात्मिक व शास्त्रीय मार्ग आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. नैसर्गिक पद्धतीने व चैतन्याचा उपयोग करून शेतीचे उत्पादन तीस ते चाळीस टक्के वाढते हे सिद्ध झालेले आहे. देश-विदेशातील अनेक साधक गेल्या ५० वर्षांपासून याचा आनंद घेत आहेत. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा सहजयोग परिवाराने केले आहे.    
आपल्या शरीरात पाठीच्या कण्यामध्ये सर्वात खाली असलेल्या त्रिकोणी माकड हाडात परमेश्वराची सुप्त इच्छाशक्ती असते. ती शक्ती श्री माताजींच्या परम कृपेत जागृत होऊन आपल्या टाळूतून बाहेर पडते व सर्वव्यापी परमेश्वरी शक्तीशी एकरूप होते. हे परमेश्वरी चैतन्य आपल्या दोन्ही हातांतून व टाळूतून थंड किंवा कोमट हवेच्या स्वरूपात वहायला लागते. यालाच आत्मबोधाची प्रचिती असे म्हणतात. या आत्मबोधाच्या प्रचितीनंतर नियमित ध्यानाने आपल्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक व अध्यात्मिक संतुलन प्रस्थापित होते. आपले वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक जीवन संतुलनात येते. मनुष्य आनंद, प्रेम, शांति व समाधानाने आपले जीवन व्यतीत करतो.