maharashtra

शिवसैनिकांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत

ना. एकनाथ शिंदे : कराडात प. महाराष्ट्र शिवसेना पदाधिकारी संवाद शिबिर संपन्न

Shiv Sainiks should strive for party growth
सरकार सर्वसामान्य लोकांसाठी, तसेच त्यांचा विकास करण्यासाठी असते. महाराष्ट्राचा विकास गतीने होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंत्री प्रयत्न करत आहेत. सरकार म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्र्यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोचवून शिवसैनिकांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कराड : सरकार सर्वसामान्य लोकांसाठी, तसेच त्यांचा विकास करण्यासाठी असते. महाराष्ट्राचा विकास गतीने होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंत्री प्रयत्न करत आहेत. सरकार म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्र्यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोचवून शिवसैनिकांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी ३१ रोजी आयोजित  पश्चिम महाराष्ट्र शिवसेना पदाधिकारी संवाद शिबिरात ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. महेश शिंदे, आ. अनिल बाबर, शिवसेना नेते दिवाकर रावते, सातारा-सांगलीचे संपर्कप्रमुख नितिन बानुगडे-पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना. शिंदे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर अनेक शिवसैनिकांनी काम केले. आज शिवसेना 55 वर्षांची झाली असून मराठी माणसाला ताठ मानेने जगण्याचा अधिकार शिवसेनाप्रमुखांनी दिला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे शिवसेना वाढवण्याची संधी शिवसैनिकांना मिळाली आहे. त्याचे सोने करून गावागावात, घराघरात शिवसेना व शिवसैनिक निर्माण करण्यासाठी  पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. प्रामाणिकपणे काम केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. निवडणुका जिंकण्याचे तंत्र समजून घेत आवश्यकतेनुसार गोळाबेरीज करायला हवी. अन्यथा, पाडापाडीच्या राजकारणात आपणच आपला खड्डा खोदत असतो. शिवसेना वाढवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून मेहनत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ना. गुलाबराव पाटील म्हणाले, शिवसेनेच्या कालावधीत खऱ्या अर्थाने सत्तेचे विकेंद्रीकरण झाले असून राजकीय पार्श्वभूमी नसलेले अनेकजण शिवसेनेमुळेच सत्तेत गेले. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार चांगले काम करत आहे. शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील कामे घेऊन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला पाहिजे. त्याचप्रमाणे सरकारने व मंत्र्यांनी केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत. तसेच युवासेना ही शिवसेनेची ताकद असून त्यानुसार शिवसेनेची संघटनात्मक बांधणी केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
ना. उदय सामंत म्हणाले, वंचित घटकाला न्याय देण्याचे काम फक्त शिवसेनाच करू शकते. शिवसेनेचे काम, सरकारने घेतलेले निर्णय, राबवलेल्या योजना शिवसैनिकांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. तसेच शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करून पक्षाची ताकद वाढवली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेच्या हितासाठी निर्णय घेत आहेत. जनतेला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले असून लोकांना त्याचा फायदा झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.