वेळे (ता वाई) गावच्या हद्दीत गुळूंब रस्त्यावर पुलाच्या भिंतीवर दुचाकी आदळून दोनजण जागीच ठार झाले
सातारा : वेळे (ता वाई) गावच्या हद्दीत गुळूंब रस्त्यावर पुलाच्या भिंतीवर दुचाकी आदळून दोनजण जागीच ठार झाले
पुणे-बंगळूर महामार्गालगत वेळे ते गुळूंब रस्त्यावर स्मशानभुमीजवळील ओढ्यावर पुलाचे काम सुरू आहे. गुळूंब बाजुकडे दोन दुचाकीस्वार भरधाव वेगात दुचाकीवरून (एमएच ११ ए एन ८२२२) जात होते. या रस्त्यावर ओढ्यावरील पुलाचे काम सुरु असल्याने या ठिकाणी पत्रा लावून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. पत्र्याच्या कडेचे बाह्यवळण न दिसल्याने दुचाकी पुलाच्या भिंतीवर जोरदार आदळून दुचाकी वरील प्रमोद गंगाराम यादव (सिद्धनाथवाडी वाई) व त्याच्या पाठीमागे बसलेला प्रथमेश संतोष खैरे (ब्राम्हणशाही, वाई) हे दोघे दुचाकीसह पाण्यात पडले. त्यामध्ये प्रमोद यादव यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रथमेश खैरे याला उपचारासाठी सातारा येथे घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातात मोटार सायकलचे पूर्ण नुकसान झाले आहे. या रस्त्यावर पुलाचे काम सुरू असतानाही ठेकेदाराने योग्य ती काळजी न घेतल्यामुळे या रस्त्यावर अपघात होत आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली. याबाबतची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात गंगाराम यादव यांनी दिली आहे. प्रथमेश खैरे हा वाई येथील चैतन्य अर्बन बँकेतील अधिकारी संतोष खैरे यांचा मुलगा आहे. भुईंज पोलीस अधिक तपास करत आहे.


