maharashtra

सातारा शहराच्या हद्दीतुन कण्हेर कॅनॉल बंदिस्त करून पाणी न्यावे

भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांची मागणी

सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणातून कण्हेर कालवा निघालेला आहे. सातारा शहराच्या पूर्व भागातून कण्हेर धरणाचा उजवा कालवा गेलेला आहे. या कॅनॉलची दुरुस्ती आजपर्यंत झालेली नाही.

सातारा : सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणातून कण्हेर कालवा निघालेला आहे. सातारा शहराच्या पूर्व भागातून कण्हेर धरणाचा उजवा कालवा गेलेला आहे. या कॅनॉलची दुरुस्ती आजपर्यंत झालेली नाही. दोन्ही बाजूंच्या पडद्यांचे सिमेंट निघून गेले आहे आणि त्यामुळे जवान्स को-ऑप हौसिंग सोसायटी, जे सी ओज को-ऑप हौसिंग सोसायटी, ऑफिसर्स को-ऑप हौसिंग सोसायटी, कांगा कॉलनी, कूपर कॉलनी, मिलिंद सोसायटी, कोयना सोसायटी, जय विजय सोसायटी तसेच ग्रामीण भागातील चाहुर, खेड, कृष्णानगर, संगमनगर, वनवासवाडी, एम आय डी सी  तसेच  येथील जवळ जवळ २००० पेक्षा जास्त घराच्या, अस्थापनांच्या  खालून पाणी जात आहे आणि त्यामुळे घरांचे, अस्थापनांचे नुकसान होत आहे.

एका बाजूला आपल्या सरकारने पाणी वाचवण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या असताना या अशा परिस्थितीमुळे खूप पाणी वाया जात असल्याने ते शेवट पर्यंत पोचत नाही आणि पाणी न पोचल्यामुळे शासनाचा सिंचनाचा उद्देश पूर्ण होताना दिसत नाही.

नागरी वस्तीतून गेलेल्या कॅनॉलच्या दुरुस्तीबाबत विचार करून, नागरी वस्तीतून गेलेल्या कॅनॉल च्या भागामध्ये दुरुस्ती करून आणि मोठे पाईप टाकून किंवा ब्लॉक तयार करून पाणी न्यावे. ठराविक भागात दुरुस्तीसाठी चेंबर ठेवावेत, तसेच पाईपच्या वरील बाजूस वॉकिंग ट्रॅक करून काही ठिकाणी बसण्यासाठी बेंचेस टाकावेत. तसेच दोन्ही बाजूला कॅनॉल ची जागा आहे त्यावर सायकल ट्रॅक करावेत, वृक्षारोपण करावे, काही कालावधी नंतर या संपूर्ण जागेवर सोलर पॅनेलिंग करून वीज निर्मिती प्रकल्प राबवावा. यामुळे जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष, युवा तसेच लहान मुलांनाही चालण्यासाठी, फिरण्यासाठी सुरक्षित जागा निर्माण होईल आणि सामान्य लोकांना होणारा पाणी गळतीचा त्रास कमी होऊन सिंचनासाठी पाणी शेवटपर्यंत पोचवण्याचा उद्देश सुद्धा सफल होईल, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन पुढील कार्यवाही, सर्वेक्षण करण्याचे आदेश कार्यकारी संचालक, कृष्णा खोरे महामंडळ पुणे यांना दिले आहेत

यावेळी भारतीय जनता पार्टी, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, नगरसेवक धनंजय जांभळे उपस्थित होते.