मंगळवार तळे संरक्षणासाठी चेनलिंक जाळी चा प्रस्ताव
नगरसेवक वसंत लेवे यांनी नगरपालिकेकडे मागितली परवानगी
मंगळवार तळे संपूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर या तळ्याच्या संरक्षणासाठी प्रभाग क्रमांक 18 चे नगरसेवक वसंत लेवे यांनी पुढचे पाऊल उचलले आहे. तळ्याच्या संरक्षक भिंतीची पडझड होत असल्याने पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने तळ्याच्या बाजूने चेनलिंक जाळी बसवण्याचा प्रस्ताव लेवे यांनी नगरपालिकेला सादर केला आहे
सातारा : मंगळवार तळे संपूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर या तळ्याच्या संरक्षणासाठी प्रभाग क्रमांक 18 चे नगरसेवक वसंत लेवे यांनी पुढचे पाऊल उचलले आहे. तळ्याच्या संरक्षक भिंतीची पडझड होत असल्याने पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने तळ्याच्या बाजूने चेनलिंक जाळी बसवण्याचा प्रस्ताव लेवे यांनी नगरपालिकेला सादर केला आहे आणि तळे हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळे वरिष्ठ श्रेणी च्या परवानगीने या प्रस्तावास मंजुरी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ऐतिहासिक मंगळवार तळे हे खासदार उदयनराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचे आहे. तसेच या कार्याला हेरिटेजचा दर्जा असल्यामुळे तेथे फारशी दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम करता येत नाही. तरीसुद्धा तळे मध्यवस्तीत असल्यामुळे आणि त्या तळ्यात संपूर्णपणे पाणी प्रदूषित झाल्यामुळे प्रभाग क्रमांक 18 चे नगरसेवक वसंत लेवे यांनी स्वखर्चाने तळे स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. संपूर्ण चार दिवसात जवळपास दीड टन शेवाळ स्वच्छ केले. याशिवाय तळ्यात खोडी उतरून त्यांनी कानाकोपऱ्यातल्या गाळ उपसला. आता यापुढे जाऊन वसंत लेवे मित्र समूहाच्या वतीने सातारा नगरपालिकेला मंगळवार तळे संरक्षक भिंतीच्या कडेने चेनलिंक जाळी चा प्रस्ताव देण्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी मंगळवार तळ्यात एका वृद्ध देणे उडी मारुन आत्महत्या केली होती तेव्हा येथील सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला होता त्यामुळे चेनलिंक जाळी बसविण्यास परवानगी मिळाल्यास सदर मंगळवार तळ्याचे संरक्षण होणार आहे, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. हा प्रस्ताव वसंत लेवे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेऊन त्यांना सादर केला. या प्रस्तावाची पुरातत्त्व विभागाच्या सूत्रांनी चर्चा करून परवानगी तातडीने उपलब्ध करून देता येईल का या संदर्भात चर्चा करू, असे आश्वासन अभिजित बापट यांनी दिले. तसेच मंगळवार तळ्याची स्वच्छता सातत्याने रहावी याकरिता नगरपालिकेच्या माध्यमातून रोज एक तास तळ्याची स्वच्छता करणारी चार कामगारांची एक टीम येथे उपलब्ध राहणार आहे. तळ्यामध्ये कचरा अथवा तत्सम पदार्थ टाकल्यास ते तातडीने स्वच्छ करण्यात येणार आहे.


