गेल्या अनेक महिन्यांपासून सातारा येथील जिल्हा परिषद चौकातील बंद असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची पालिकेला उपरती झाली.
सातारा : गेल्या अनेक महिन्यांपासून सातारा येथील जिल्हा परिषद चौकातील बंद असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची पालिकेला उपरती झाली.
सातारा जिल्हा परिषद चौक हा अत्यंत गजबजलेला मानला जातो. या परिसरात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची मुख्य शाखा, शासकीय विश्रामगृह, कल्याणी शाळा, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, धनंजय गाडगीळ महाविद्यालय, अनेक पतसंस्था, नामवंत बेकरी, अनेक मोबाइल्सची दुकाने असल्यामुळे हा परिसर सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत गर्दीने गजबजून जात असतो. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद चौकांमध्ये सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आलेली सिग्नल यंत्रणा बंद पडली होती. या यंत्रणेतील फ्युज कंडक्टर निकामी झाल्यामुळे सिग्नल बंद असल्याचे सांगण्यात येत होते.
सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे या चौकात दिवसभर एक वाहतूक पोलिस तैनात करण्यात येत होता. रात्रीच्या वेळी मात्र तशी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत होते. पालिकेनेही सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत होता. अखेर शुक्रवारी संध्याकाळी जिल्हा परिषद चौकातील सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात पालिकेला यश आल्यानंतर हे सिग्नल पुन्हा एकदा नव्याने कार्यान्वित झाले आहेत.


