maharashtra

कास परिसरातील हॉटेलवर महसूल विभागाची कारवाई

पाच हॉटेल सील झाल्याची कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा

जागतिक वारसा स्थळ लाभलेल्या कास पठार परिसरातील अतिक्रमण केलेल्या हॉटेलवर महसूल विभागाने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. मात्र ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली. कारवाईमध्ये पाच हॉटेल सील करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाई संदर्भात तहसीलदारांनी कारवाईचा भाग म्हणून अधिक बोलण्यास स्पष्ट नकार दिला.

सातारा : जागतिक वारसा स्थळ लाभलेल्या कास पठार परिसरातील अतिक्रमण केलेल्या हॉटेलवर महसूल विभागाने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. मात्र ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली. कारवाईमध्ये पाच हॉटेल सील करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाई संदर्भात तहसीलदारांनी कारवाईचा भाग म्हणून अधिक बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
कास पठारकडे असणाऱ्या हॉटेल्सनी केलेली बेकायदेशीर अतिक्रमणे आणि बांधकामे यासंदर्भात पर्यावरण प्रेमींनी वारंवार आवाज उठवून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारींची दस्तुरखुद्द पर्यावरण मंत्रालयाने दखल घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा स्वयं स्पष्ट अहवाल प्रांत मिनाज मुल्ला यांच्याकडे मागितला होता. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादरही करण्यात आला. मात्र कारवाईचे कोणतेही पाऊल उचलण्यात आले नव्हते. प्रांतांच्या सूचनेनुसार तहसीलदार राजेश जाधव यांनी गुरुवारी कास मार्गावरील पाच हॉटेल सील केल्याची चर्चा आहे. मात्र या कारवाईचा कोणताही तपशील प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचू देण्यात आला नव्हता. तहसीलदार राजेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाईचा भाग म्हणून अधिक स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. कारवाई झाल्याचे त्यांनी मान्य केले, मात्र फार तपशिलात माहिती दिली नाही. कास पठार परिसरात बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या हॉटेल्सची संख्या 76 हुन अधिक आहे. मात्र या संदर्भात कधीच कोणती कारवाई झाली नव्हती. महसूल विभागाने अचानक गोपनीयरित्या या कारवाईचे मिशन राबवल्यामुळे हॉटेल चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.