मलकापूर नगरपालिका कार्यक्षेत्रामधील 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी 8 रोजी येथील नुतन मराठी प्राथमिक शाळेत मलकापूर नगरपालिका व काले प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून संयुक्तरित्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
कराड : मलकापूर नगरपालिका कार्यक्षेत्रामधील 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी 8 रोजी येथील नुतन मराठी प्राथमिक शाळेत मलकापूर नगरपालिका व काले प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून संयुक्तरित्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन सभापती प्रशांत चांदे, महिला व बालकल्याण समिती सभापती शकुंतला शिंगण, उपसभापती स्वाती तुपे, नगरसेवक सागर जाधव, मुख्याध्यापक पाटील, सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.
राज्यभरात कोविड-19 च्या संभाव्य तिसरी लाटेच्या अनुषंगाने 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहिम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यानुसार मलकापूर शहरातील 15 ते 18 वयोगटातील मुलांची सुरक्षितता विचारात घेऊन आशा सेविकांमार्फत एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार शहरामधील सर्व माध्यमिक व उच्च्ा माध्यमिक शाळांमध्ये काले प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या सहकार्याने 1 हजार 900 मुलांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी मलकापूर नगरपालिका व काले प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यावतीने स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेमध्ये हे लसीकरण सुरु आहे.
मलकापूर नगरपालिका कार्यक्षेत्रामधील नागरिकांसाठी नगरपालिकेने 2 लसीकरण केंद्रे कार्यान्वीत ठेवली आहेत. त्यामाध्यमातून शहरातील एकूण 95 टक्के नागरिकांचा पहिला डोस पुर्ण झाला असून 75 टक्के पेक्षा जास्त नागरिकांचा दुसरा डोस पुर्ण झाला आहे. 26 जानेवारी 2022 पुर्वी 100 टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. लसीचे दोन्ही डोस पुर्ण झालेल्या नागरिकांना कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेपासून दिलासा मिळालेला आहे.
शासनाने नुकतेच 60 वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस देण्याचे नियोजित केले असून मलकापूर नगरपालिकेने यापुर्वीच शहरातील 60 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण पुर्ण केले आहे. त्याची अद्यावत यादी आशा सेविका यांच्याकडे उपलब्ध असून बुस्टर डोस देण्यासाठी या यादीचा उपयोग होणार आहे. कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता अद्याप ज्या नागरिकांनी लस घेतलेली नाही. त्यांनी पहिला व दुसरा डोस घेवून मलकापूर शहर कोरोना मुक्त राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी केले आहे.


