maharashtra

रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार : खा. उदयनराजे भोसले


Russia-Ukraine war will affect economy: Udayanraje Bhosle
रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे केंद्राची जबाबदारी आहे. युद्धाचा परिणाम फक्त भारतावरच नाही तर प्रत्येकाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे, असे मत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

सातारा : रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे केंद्राची जबाबदारी आहे. युद्धाचा परिणाम फक्त भारतावरच नाही तर प्रत्येकाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे, असे मत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. हे कर्म आहे, याच जन्मात परतफेड करावी लागते. याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. जर तथ्य नसते तर ते झाले नसते, अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी महाविकास आघाडीवर नेत्यांविरोधात होत असलेल्या कारवाईसंदर्भात व्यक्त केली.
गुरुवारी रात्री सातारा येथील गांधी मैदान येथे झालेल्या कार्यक्रमानंतर उशिरा ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. रशिया आणि युक्रेनमध्ये या संघर्षात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात सुखरुप आणण्याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले, मी प्रयत्नशील आहेच. पण काही गोष्टी सांगाव्या लागत नाहीत. त्यामुळे जे भारतीय दोन्ही देशात अडकले आहेत, त्यांना मायदेशात सुखरूप आणण्यासाठी भारत सरकारने जबाबदारी समजून प्रत्येकाला परत आणले पाहिजे. रशिया आणि युक्रेन संघर्षातून युद्धापर्यंत गेलेल्या परिस्थितीचा त्यांनी निषेध केला. युद्धाचा परिणाम फक्त भारतावरच नाही तर प्रत्येकाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. जे भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांनाही तातडीने मदत झाली पाहिजे,  अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली.
राज्यात मंत्र्यांना अटक होत आहे, याकडे तुम्ही कसे पाहता? असे विचारले असता ते म्हणाले, ती त्यांच्या कर्माची फळे आहेत. त्यांनी गुन्हा केला असेल त्याची परतफेड करावीच लागेल. कायद्याने सर्व काही होत आहे. यामध्ये काही राजकारण नाही. सर्वसामान्यांना एक न्याय आणि या सगळ्यांना एक न्याय असे होत नाही. अनेक गोष्टी उघडपणे बोललो असून, राजकारण म्हणून बोललो नाही. याचा परिमाण मतदार, सर्वसामान्यावंर किती होतो याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. लोकांचा राजकारण्यांवरील विश्वासच उडाल्याचे चित्र दिसत आहे. लोक जेव्हा पाहतात तेव्हा डोळ्यांमध्ये आत्मियता असायला हवी. पण, ती आता कमी होत चालली आहे, असे स्पष्ट मत उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, मराठा आरक्षण मुद्द्यावर न बोललेले बरे. सगळीकडे राजकारण आणणार असाल तर बोलून बोलून तोंडाची चव गेली,  अशी नाराजी उदयनराजे यांनी यावेळी व्यक्त केली.