maharashtra

कजाकिस्तानच्या व्यक्तीचा सातार्‍यातील हॉटेलमध्ये मृत्यू

आकस्मित मृत्यूची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद

कजाकिस्तान या देशातून आलेल्या एका व्यक्तीचा सातार्‍यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी समोर आली. आलेकक्षी पोडवालणी वय 39, राहणार करांगडा, कजाकिस्तान असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

सातारा : कजाकिस्तान या देशातून आलेल्या एका व्यक्तीचा सातार्‍यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी समोर आली. आलेकक्षी पोडवालणी वय 39, राहणार करांगडा, कजाकिस्तान असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, आलेकक्षा हे कजाकिस्तान मधील एका कंपनीत काम करत होते. सातार्‍यातील एका कंपनीच्या इन्स्पेक्शन साठी ते 10 ऑक्टोबरला सातार्‍यात आले होते. पुणे-बेंगलोर महामार्गालगत असलेला एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. दरम्यान रविवारी दुपारी हॉटेलचा दरवाजा ते उघडत नव्हते. त्यांचा फोनही बंद होता. त्यामुळे कंपनीच्या कर्मचार्‍यांनी दुसर्‍या चावीने दरवाजा उघडला असता ते बेडवर मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला.
सातारा येथे कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आलेले नाही. कजाकिस्तानच्या प्रशासनाशी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी संपर्क साधला असून मृतदेह नेण्यासाठी नातेवाईक रवाना झाले आहेत.