छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात पालखी मिरवणूक
शाहूनगरी फाउंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती आणि ऐतिहासिक शाहूनगरी चे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती, या मिरवणुकीचे आयोजन शाहूनगरी फाउंडेशनच्या संस्थापक वृषालीराजे भोसले यांच्या वतीने करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यामध्ये सातारकर मंडळी उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती.
सातारा : मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती आणि ऐतिहासिक शाहूनगरी चे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती, या मिरवणुकीचे आयोजन शाहूनगरी फाउंडेशनच्या संस्थापक वृषालीराजे भोसले यांच्या वतीने करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यामध्ये सातारकर मंडळी उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती.
छत्रपती शाहू महाराजांच्या 324 व्या जयंतीनिमित्त शाहूनगरी फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. या निमित्ताने सातारा शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक छत्रपतींचे निवासस्थान असलेल्या अदालत वाडा येथून सुरु होऊन समर्थ मंदिर, राजवाडा, मोती चौक, कमानी हौद मार्गे गुरुवारबागेतील तख्ताच्या वाड्यापर्यंत नेण्यात आली. छत्रपती वृषालीराजे भोसले आणि समस्त सातारकर यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू महाराजांच्या मुर्तीस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भव्य रक्तदान शिबिराचा वृषालीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी कोरोनाच्या काळात महत्त्वपूर्ण कार्य केलेल्या कोविड योध्यांचा सन्मान शाहूनगरी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना वृषालीराजे म्हणाल्या, छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचे स्मरण आजच्या पिढीला व्हावे तसेच साताऱ्याच्या ऐतिहासिक परंपरा किती प्रगल्भ होत्या हे समजावे याकरिता हा जयंती सोहळ्याचा छोटा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साताऱ्याच्या विविध परंपरा पुनरुज्जीवित ठेवणे हे फाऊंडेशनचे उद्दिष्ट आहे. त्या माध्यमातून शाहू नगरीचा विकास आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवणे हा आमच्या सामाजिक कार्याचा एक भाग आहे.
यावेळी फाऊंडेशनचे खजिनदार मनोज शेंडे, माजी नगरसेवक सुहास राजेशिर्के, श्रीकांत आंबेकर, अशोक मोने, छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिशा विकास मंच अध्यक्ष निलेश मोरे यांनी केले. गणेश दुबळे यांनी आभार मानले.


