दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा
आनंदवाडीसह साताऱ्यात दत्तदर्शनासाठी भाविकांच्या रांगा
दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष, भजन, कीर्तन अशा उत्साही व भक्तिपूर्ण वातावरणात सातारा शहरात बुधवारी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सातारा : दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष, भजन, कीर्तन अशा उत्साही व भक्तिपूर्ण वातावरणात सातारा शहरात बुधवारी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आनंदवाडी येथील दत्त मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी भाविकांची गर्दी होती. भजन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले.
विविध मंदिरांत श्री दत्त जन्मकाळ सोहळा झाला. यावेळी भक्तांनी मंदिरे फुलून गेली होती. सातारा, गोंदवले, माहुली येथील स्वामी समर्थ मंदिरात दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी श्री दत्त जन्मकाळ सोहळा झाला. दरम्यान, शहरासह उपनगरामधील दत्त मंदिरांतही मोठ्या उत्साहात जयंती साजरी झाली. येथील शनिवार पेठेतील येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र (दिंडोरीप्रणीत) येथे श्री दत्त जयंतीनिमित्त रविवारी सकाळी गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायाचे वाचन झाले. यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी झाली होती.
दुपारी श्री दत्त जन्मकाळ सोहळा स्वामी समर्थ मंदिरात झाला. त्यानंतर आरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. रविवार पेठ येथे दत्त मंदिरात पहाटे अभिषेक, सकाळी आरती झाल्यानंतर गुरुचरित्राचे वाचन करण्यात आले. यावेळी भक्तांना मसाले दूध, भात वाटप करण्यात आला. सायंकाळी 6 वाजून 1 मिनिटांनी श्री दत्त जन्मकाळ सोहळा भक्तांच्या उपस्थितीत झाला. यानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दिवसभर कीर्तन,भजन असे धार्मिक कार्यक्रम झाले. रात्री पालखी मंदिर प्रदक्षिणा झाली. त्याचबरोबर आनंदवाडी व मुतालिक दत्त मंदिर येथे पहाटे रुद्राभिषेक झाला.
सकाळी आरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. दत्त दर्शनासाठी भक्तांची दिवसभर गर्दी होती. सायंकाळी सहा वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा झाला. त्यानंतर रात्री मंदिरापासून भव्य पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली.प्रतापगंज पेठेतील मुतालिक दत्त मंदिर, आनंदवाडी येथील दत्त मंदिर, सातारा मध्यवर्ती आगार बसस्थानक, मंगळवार तळे गोंदवले व नारायणपूर दत्त मंदिर, इ. ठिकाणी दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दत्त मंदिरातील दत्त सोहळा पाहण्यासाठी भाविकांसाठी मंदिराबाहेर भव्य स्क्रीनची सोय केली होती.


