गोटेत रिमोटद्वारे वीज मीटर नियंत्रित करून वीज चोरी
दोघांवर गुन्हा : पी.बी. पॉलीमर्सवर भरारी पथकाची कारवाई, साडे सत्तावीस लाखांची वीज कंपनीची फसवणूक
गोटे, ता. कराड येथे रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वीज मीटर नियंत्रित करून वीज चोरी केल्याची घटना उघडा झाली आहे. याप्रकारे गेल्या वर्षभरात तब्बल 2 लाख 40 हजार 305 युनिट इतकी वीज चोरी केली असून त्याची किंमत तबल 27 लाख 57 हजार 400 रुपये आहे. वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने गोटे येथील पी.बी. पॉलीमर्सवर ही कारवाई केली.
कराड : गोटे, ता. कराड येथे रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वीज मीटर नियंत्रित करून वीज चोरी केल्याची घटना उघडा झाली आहे. याप्रकारे गेल्या वर्षभरात तब्बल 2 लाख 40 हजार 305 युनिट इतकी वीज चोरी केली असून त्याची किंमत तबल 27 लाख 57 हजार 400 रुपये आहे. वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने गोटे येथील पी.बी. पॉलीमर्सवर ही कारवाई केली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रज्जाक बाबालाल पटेल व खालिद रज्जाक पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अतिरिक्त कार्यकारी अभियंता उज्वला मोहन लोखंडे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी संशयितांनी लबाडीने व अप्रामाणिक हेतूने वीज चोरी करून कंपनीची फसवणूक केल्याबाबत त्यांच्यावर विद्युत कायदा कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वीज ग्राहकांच्या वीज मीटरची व जोडभाराची तपासणी करणे, वीज चोरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे, तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी उज्वला लोखंडे यांच्यासह आशिष अर्जुन जगधने, किरण प्रकाश देवकर, प्रवीण बी. सरवदे यांच्या भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार २७ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भरारी पथकाने गोटे येथील रज्जाक पटेल यांच्या औद्योगिक दराच्या वीज कनेक्शनची तपासणी केली. यामध्ये विज वापर व त्यांना आलेल्या बिलामध्ये तफावत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पी.बी. पॉलिमरचे रज्जाक पटेल यांना मीटरची जागा दाखवण्यास व वीज बिलाची प्रत मिळण्याची विनंती केली. त्यानंतर भरारी पथकाने वीज मीटरची पाहणी केली असता ते पी.बी. पॉलीमर्ससाठी वीज वापर करत असल्याचे लक्षात आले.
त्यानंतर भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी वीज मीटर व त्यावरील विजेचा वापर पाहिला असता त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी वीज मीटरवरील झाकण व वीज मीटर बारकाईने पाहिले. यावेळी त्यांना वीज मीटरला बारीक छिद्र पाडून त्याच्या साह्याने मीटरमध्ये एका बाजूला छोटे किट बसविल्याचे दिसून आले. त्याच्या साह्याने विजेचा वापर कंट्रोल केला जात होता. त्या किटला रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने नियंत्रणात ठेवले जात होते. याबाबतची खात्री पटल्यानंतर भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वीज मीटर सील करून जप्त केले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मीटरची चाचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली असता किट बसवल्यामुळे मीटर हळू फिरत असल्याचे समोर आल्याने वीज चोरी झाल्याचे लक्षात आले.
अशाप्रकारे गेल्या वर्षभरापासून संबंधितांनी वीज चोरी करून तब्बल २ लाख ४० हजार ३०५ युनिट वीज वापर केली आहे. त्याची २७ लाख ५७ हजार ४०० रुपये इतकी किंमत असून या रकमेचे वीज चोरीचे बिल रज्जाक पटेल यांना वीज कंपनीने दिले. परंतु, पटेल यांनी वीज चोरी झालेल्या बिलाची रक्कम कंपनीकडे भरली नसल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वीज चोरीसाठी वापरलेले साहित्य मीटर, किट, रिमोट आदी. जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरुटे अधिक तपास करत आहेत.


