२५९ ग्रामपंचायतीसाठी जिल्ह्यात ८२ टक्के मतदान
किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान सर्वत्र शांततेत पडले पार
सातारा जिल्ह्यात रविवारी २५९ ग्रामपंचायतीसाठी ९२६ मतदान केंद्रावर सदस्यपदासाठी ३ हजार ८९४ अन सरपंचपदासाठी २४२ जागावर ६४८ जणांमध्ये थेट निवडणुक झाली. यासाठी प्रत्यक्ष मतदान हे ८२ टक्के झाल्याचे ग्रामपंचायत निवडणुक विभागातून सांगण्यात आले.
सातारा : सातारा जिल्ह्यात रविवारी २५९ ग्रामपंचायतीसाठी ९२६ मतदान केंद्रावर सदस्यपदासाठी ३ हजार ८९४ अन सरपंचपदासाठी २४२ जागावर ६४८ जणांमध्ये थेट निवडणुक झाली. यासाठी प्रत्यक्ष मतदान हे ८२ टक्के झाल्याचे ग्रामपंचायत निवडणुक विभागातून सांगण्यात आले. दरम्यान, संवेदनशील मतदान केंद्रावर जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी वरीष्ठ पोलीस अधिकारी, तहसीलदार यांनीही मतदान केंद्रावर भेटी दिल्या. महाबळेश्वर येथे बॅलेट मशिन काही वेळ तांत्रीक कारणाने बंद पडल्या होत्या. तर काही ठिकाणचे किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान सर्वत्र शांततेत पार पडले. या निवडणुकीचा निकाल २0 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने जिल्हावासियांमधून मोठी उत्सुकता दिसुन येत आहे.
सातारा जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतीची निवडणुक जाहीर झाल्यानंतर त्यापैकी अंशत बिनविरोध झाल्यानंतर उर्वरीत २५९ ग्रामपंचायतीसाठी मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लोकशाहीच्या या उत्सवात यावर्षी नागरिकांनीही स्वत:च संयम राखल्याने मतदान खेळीमेळीत पार पडले.
जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया रविवारी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत पार पडली. २५९ गावांमध्ये शांततेत मतदान पार पडावे. यासाठी प्रशासन अलर्ट होते. निवडणुकीच्या आदल्या रात्री अनेक गावे रात्री उशीरापर्यंत जागी होती. कोणी पैसे वाटायला बाहेरचे येते काय? यासाठी गावातल्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते चौकाचौकात थांबल्याचे दिसून आले. याच दरम्यान, छुप्पा प्रचारही सुरु होता. पोलीस प्रशासनाच्यावतीने अशा गावांमध्ये रात्रीची गस्त घातली. पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री १२ वाजता गावात जावून स्थानिक गटनेत्यांना आणि कार्यकर्त्यांना घरी जाण्याचे आवाहन केले. रविवारी सकाळी मतदान केंद्रातील मतदान अधिकारी, कर्मचारी हे यंत्रे जोडून मतदानासाठी सज्ज झाली. यावेळी पोलीस बंदोबस्त प्रत्येक मतदान केंद्रावर देण्यात आला होता. मतदान केंद्राच्या १00 मीटर अंतराबाहेर गावांमधील दोन पॅनेलचे बुथ लागले होते. पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गावातील दोन्हीकडील गटनेते यांनी चांगलीच कंबर कसली होती. मतदान अधिकाधिक व्हावे, यासाठी दोन्हीकडील गटनेत्यांचे प्रयत्न जोरदार दिसले. त्यामुळे काही ठिकाणी मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्रात प्रवेश केलेल्यांचे मतदान प्रक्रिया सुरु होती.
गावातले दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांना आणण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या तत्परतेने पुढे होवून त्यांना मदत करताना दिसत होते. काही कार्यकर्त्यांनी तर त्यांच्याऐवजी स्वत:च मतदान केल्याची चर्चा सुरु होती. जिल्ह्यात काही ठिकाणी तू....तू....मै.....मै...चे वादावादीचे प्रकार घडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर ते वेळीच मिटले. सातारा तालुक्यातील माहुली येथे मतदानकेंद्रापर्यंत गावांतर्गत जाणारा रस्ता वाहतूकीसाठी बंद केल्याने नागरिकांना पायी चालत जावे लागल्याने पोलिस प्रशासनाच्या या भूमीकेवरुन काही वेळ तणावाचे वातावरण बनले होते पण त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर हा तणावही निवळला. सायंकाळी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे सुरक्षीतरित्या सिल करुन तालुक्याच्या ठिकाणी पोहचवली. दि. २0 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे त्या निकालाकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
वाई येथे ७९.८८ टक्के मतदान
वाई : वाई तालुक्यात सात ग्रामपंचायतीसाठी ६ हजार ९४८ महिलांनी तर ७ हजार ६७८ पुरुषांनी असे १४ हजार ६२६ मतदारांनी मतदान केले. वाई तालुक्यात ७९.८८ टक्के मतदान झाल्याचे वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले. गोवेदिगर येथे ५९0 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ८४.६५ टक्के मतदान झाले. काळंगवाडीसाठी ७७३ जणांनी मतदान केल्याने ८८.१४ टक्के मतदान झाले. पांडे येथे ८५.२५ टक्के मतदान झाले. किकली येथे ८३.१८ टक्के मतदान झाले. बोपर्डीयेथे ८७.४९ टक्के मतदान तर कवठ येथे ८१ टक्के मतदान झाले. भुईज येथे २६८३ महिलांनी तर ३0२१ पुरुषांनी असे ५७0४ मतदारांनी मतदान केल्याने ७४.0४ टक्के मतदान झाले. वाई तालुक्यात ६ हजार ९४८ महिलांनी तर ७ हजार ६७८ पुरुषांनी असे १४ हजार ६२६ मतदारांनी मतदान झाल्याने वाई तालुक्यात ७९.८८ टक्के मतदान झाले.
कुमठेत मोठा पोलिस बंदोबस्त
कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथे दि.१५ पासून झालेल्या वादावादीमुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. कुमठेसारख्या संवेदनशील गावांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जाणीवपूर्वक ठेवण्यात आला होता. २५९ ग्रामपंचायतीसाठी ९२६ मतदान केंद्रावर ४ लाख ४३ हजार ३१९ मतदारांपैकी २ लाख १५ हजार ६0४ महिला मतदार तर २ लाख २७ हजार ७१२ पुरुष मतदार हक्क बजावणार होते. त्यापैकी सुमारे ९५ टक्के मतदान झाल्याचे ग्रामपंचायत निवडणूक शाखेतून सांगण्यात आले. दुपारी ३.३0 वाजेपर्यत १ लाख ५२ हजार ७८0 महिलांनी, १ लाख ५७ हजार ७९८ पुरुषांनी तर इतर १ अशा ३ लाख १0 हजार ५७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
८२ टक्के मतदान
सातारा जिल्ह्यात रविवारी २५९ ग्रामपंचायतीसाठी ९२६ मतदान केंद्रावर सदस्यपदासाठी ३ हजार ८९४ अन सरपंचपदासाठी २४२ जागावर ६४८ जणांमध्ये थेट निवडणुक झाली. यासाठी प्रत्यक्ष मतदान हे ८२ टक्के झाल्याचे ग्रामपंचायत निवडणुक विभागातून सांगण्यात आले. त्यानुसार तालुकानिहाय गावे अन कंसात टक्केवारी मतदान पुढीलप्रमाणे : सातारा २९ (८0), जावळी ११ (७0), कोरेगाव ४३ (८५) वाई ७ (७९.८८), खंडाळा २ (७५.४६), महाबळेश्वर ३ (८२), कराड ३३ (८३.१४), पाटण ७१ (७८.६८), फलटण २0 (८२.४३), माण २८ (८0), खटाव १२ (७९).


