सातारा जिल्ह्यातील सहा जणांना तडीपारीचा दणका
एक वर्षाच्या हद्दपारीचा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांचा आदेश
सातारा : सातारा व कराड तालुक्यात मटका जुगार जबरी चोरी आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन टोळीतील सहाजणांना एक वर्षासाठी सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी हे आदेश दिले.
सातारा शहर व तालुक्यात मटका अड्डा चालविणे, जबरी चोरी करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये हवे असणारी समीर सलीम कच्छी (वय ३९, रा. मोळाचा ओढा), अक्षय अनिल तळेकर (रा. हरपळवाडी, ता. कराड), शुभम उद्धव इंदलकर (वय २८, रा. कळंबे) ही टोळी बेकायदा मटका चालवित होती. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ए एस चौधरी यांनी या तीन इसमांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या टोळीला पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस कायदा 55 प्रमाणे एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले.
उंब्रज पोलीस ठाणे हद्दीत सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण व खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सूरज मारुती धस टोळी प्रमुख (वय २८, रा. माळवाडी, पोस्ट मसूर), नितीन चंद्रकांत जाधव (वय २५, रा. मसूर), अजय शरद जाधव (रा. मसूर, ता. कराड) या टोळीला हद्दपार करण्याचा प्रस्ताव उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सादर केला होता. या टोळीला पोलीस अधीक्षक बन्सल यांनी सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव, वाळवा, शिराळा या तालुका हद्दीतून हद्दपार केले आहे.
या दोन्ही टोळ्यांना वर्तन सुधारण्याची वारंवार संधी देऊनही त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नव्हती. दहशत व हिंसक कारवायांना आळा बसावा म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक बन्सल यांनी पदभार स्वीकारल्या पासून 36 प्रस्तावातून 73 जणांना तडीपार केले आहे.


