राष्ट्रवादी कॉंग्रेसचा साताऱ्यात गुरुवारी लाठी मोर्चा
आमदार शशिकांत शिंदे प्रशासनाच्या विरोधात आक्रमक
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी नि:पक्षपणे काम करण्याऐवजी पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे सुडबुद्धीने वागत आहेत.
सातारा : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी नि:पक्षपणे काम करण्याऐवजी पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे सुडबुद्धीने वागत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ही मंडळी काम करत असून या विरोधात आवाज उठवण्यासाठी येत्या गुरुवारी (दि. २३) राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध लाठी मोर्चा काढण्यात येणार असून यावेळी अधिकाऱ्यांचा पुराव्यांसह पोलखोल करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आज येथे दिला.
राष्ट्रवादी भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेस जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, गोरखनाथ नलवडे, तेजस शिंदे, अतुल शिंदें यांच्यासह युवकचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात राजकारण विरहित वातावरण होते. मात्र, सत्ता बदलानंतर सहा-सात महिन्यात विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह इतर सर्व अधिकारी एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखे वागत आहेत. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत आहे. ते कोणाच्या दबावाखाली काम करतात, हे पुराव्यासह उघडकीस आणणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरुवारी (दि. २३) सकाळी दहा वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा लाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. मेडिकल कॉलेजच्या भंगार चोरीबाबत एक महिन्यात कारवाईचे आश्वासन देऊनही अद्याप कोणी गुन्हा दाखल करायचा, यातच सर्व अडकून पडले आहे.
भंगार चोरणाऱ्यांशी या अधिकाऱ्यांशी साटेलोटे आहे. शासकीय अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करतात, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफीचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात आहे. विज वितरणकडे डीपींची कमतरता आहे. नोकरभरतीकडे दूर्लक्ष झालेले आहे.
या सर्व बाबींवर आवाज उठविला जाणार आहे. एकुणच प्रशासकीय अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या हातातील कठपूतली झाले आहेत. सुडबुद्धीने अधिकारी पूर्णपणे एकतर्फी वागत आहेत. हा जिल्ह्याचा मोर्चा असून कोरेगावमधून वाईट प्रवृत्ती हटविण्यासाठी आगामी काळात लढणार असल्याचे आमदार शिंदेंनी सांगितले.


