मालखेडनजीक अज्ञात चोरट्यांनी पोकलॅन चालक व कामगाराला लुबाडले
चाकू व कोयत्याचा धाक दाखवून 25 हजाराचा ऐवज लंपास
मालखेड, ता. कराड येथे अज्ञात चोरट्यांनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून पोकलॅन मशिनवरील परप्रांतीय चालकासह त्याच्या कामगाराकडून सुमारे 25 हजाराचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी 7 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घडली. याबाबत पारसनाथ आवधेश कुमार यादव यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कराड : मालखेड, ता. कराड येथे अज्ञात चोरट्यांनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून पोकलॅन मशिनवरील परप्रांतीय चालकासह त्याच्या कामगाराकडून सुमारे 25 हजाराचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी 7 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घडली. याबाबत पारसनाथ आवधेश कुमार यादव यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हैदर हजारीबाग भागातील पारसनाथ आवधेश कुमार यादव व त्याचा कामगार दिलीप कुमार (झारखंड) हे दोघे कराडमधील तुषार कदम यांच्या पोकलॅन मशीनवर कामास आहेत. ते मशिन सध्या मालखेड गावच्या हद्दीत भारत गॅसच्या सीएनजी गॅस पाईपलाईनच्या खुदाईसाठी वापरण्यात येत आहे.
गुरूवारी 6 रोजी रात्री काम संपल्यानंतर पारसनाथ व त्याचा कामगार दिलीप कुमार हे पोकलॅन मशिनमध्येच झोपी गेले. शुक्रवारी 7 रोजी पहाटे अज्ञात तिघांनी त्यांना उठवले. संबंधितांच्या हाताच चाकू व कोयता होता. कोयत्याने हात तोडण्याची धमकी देऊन त्या तिघांनी पारसनाथ याच्याकडील पैसे, अंगठी, मोबाईल तसेच दिलीप कुमार याच्याकडील पैसे व मोबाईल काढून घेतला. त्यानंतर ते तिघेजण तेथुन पसार झाले. दरम्यान संबंधितांनी रुमालाने तोंड बांधल्यामुळे पारसनाथ व दिलीप कुमार यांना त्यांचा चेहरा पाहता आला नाही.
या घटनेनंतर पारसनाथ याने त्याच्या कामाचे ठेकेदार आत्माराम नलवडे यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याने याबाबतची तक्रार दाखल केली. त्यावरुन तीन अज्ञातांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


