कोरेगाव, ता. कोरेगाव येथील तहसील कार्यालयातील महसूल कारकुन प्रवीण रघुनाथ कुंभार याने दहा हजार रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी त्याला न्यायालयाने ३ वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सातारा : कोरेगाव, ता. कोरेगाव येथील तहसील कार्यालयातील महसूल कारकुन प्रवीण रघुनाथ कुंभार याने दहा हजार रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी त्याला न्यायालयाने ३ वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी, सुलतानवाडी, ता. कोरेगाव हद्दीत तक्रारदार व त्यांच्या मित्राने खरेदी केलेल्या जमिनीतील ५.२५ गुंठे व २ गुंठे शेत जमिनी संदर्भात हरकत नोंद असलेला तक्रारीचा निकाल त्यांच्या बाजुने देण्यासाठी कोरेगाव तहसील कार्यालयातील महसूल कारकुन प्रवीण रघुनाथ कुंभार यांनी स्वतःच्या अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करून तक्रार यांच्याकडून १० हजार रुपये लाच मागितल्याची तक्रार दि. १९ नोव्हेंबर २०१२ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली होती. या तक्राराची पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य आढळले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कोरेगाव तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा लावला असता त्यामध्ये प्रवीण रघुनाथ कुंभार हा पंच व साक्षीदारांच्या समक्ष १० हजार रुपयांची लाख स्वीकारताना अलगद जाळ्यात अडकला. याबाबत तत्कालीन तपास अधिकारी सौ. वैशाली पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सौ. वैशाली पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून सातारा येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
आज शुक्रवार दि .२२ रोजी सातारा येथील विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एन. एच. जाधव यांनी प्रवीण रघुनाथ कुंभार याला दोषी ठरवून ३ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सहाय्यक सरकारी वकील मिलिंद ओक यांनी सरकारी पक्षाच्यावतीने कामकाज पाहिले. प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन राऊत यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय काटवटे यांनी मदत केली.


