अत्याचाराच्या घटनांनी सातारा हादरला
तीन वेगवेगळ्या घटनांत जिल्ह्यातील दोन अल्पवयीन सह एका युवतीवर अत्याचार
सातारा जिल्ह्यात दोघा अल्पवयीन मुलींसह एका युवतीवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी संबंधितांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात दोघा अल्पवयीन मुलींसह एका युवतीवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी संबंधितांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात असणार्या एका गावामध्ये एक अकरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असताना गणेश विष्णू सरोदे, वय 22, रा. गोडोली, ता. सातारा या युवकाने तिच्या घरात घुसून तिचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर अत्याचार झाल्याची घटना खंडाळा तालुक्यातील एका गावात घडली असून या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगेश रामचंद्र नेवसे, रा. नायगाव, ता. खंडाळा याने खंडाळा तालुक्यातील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दि. 1 जुन 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची तक्रार शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मंगेश नेवसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून अटक करण्यात आलेली नाही.
अल्पवयीन मुलीवर मंदिरातच अत्याचार; मुलासह त्याच्या वडिलांवर गुन्हा
सुमारे दोन महिन्यापूर्वी एका मंदिरात बारा वर्षाच्या मुलीवर तरुणाने अत्याचार केल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाल्यामुळे खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे संशयित तरुणाच्या वडिलांनी तू माझ्या मुलाशी लग्न कर अन्यथा तुझ्या वडिलांना व कुटुंबातील सदस्यांना मारून टाकीन अशी धमकी त्या मुलीला दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत तरुणासह त्याच्या वडिलांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 जानेवारी रोजी खंडाळा तालुक्यातील एका गावातील बारा वर्षाची अल्पवयीन मुलगी दुपारी दोन वाजता दुकानात जात असताना त्याच गावातील एका तरुणाने तिला मंदिरात बोलावून घेतले त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुझ्यासह कुटुंबातील लोकांना मारून टाकीन, अशी धमकी तरुणाने दिली. दरम्यान ही घटना घडली त्याच दिवशी संबंधित तरूणाच्या वडिलांनी मुलीला तू माझ्या मुलासोबत लग्न कर अन्यथा तुझ्या कुटुंबातील सर्वांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. याबाबतची तक्रार लोणंद पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.


