घरफोडीत सुमारे अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
कार्वे नाका येथील घटना : अज्ञातावर गुन्हा नोंद
शहरातील कार्वेनाका येथील थोरात हॉस्पिटलशेजारी बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. रविवारी 16 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत संतोष शंकर जाधव रा. मलकापूर यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कराड : शहरातील कार्वेनाका येथील थोरात हॉस्पिटलशेजारी बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. रविवारी 16 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत संतोष शंकर जाधव रा. मलकापूर यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संतोष जाधव हे कार्वेनाका येथे वास्तव्यास असून ते वीज कंपनीत ऑपरेटर म्हणून नोकरीस आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी मलकापूर येथे दुसरा फ्लॅट घेतल्याने त्याठिकाणी ते कुटूंबासह राहण्यास गेले आहेत. 7 जानेवारी रोजी संतोष यांच्यासह त्यांच्या पत्नी कार्वेनाका येथील फ्लॅटवर गेले होते. त्यानंतर सात दिवस संबंधित फ्लॅट बंद होता.
त्यानंतर गुरूवारी 13 संक्रांतीसाठी साहित्य आणण्यासाठी पुन्हा संतोष व त्यांच्या पत्नी फ्लॅटवर गेले असताना त्यांना फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी फ्लॅटमध्ये जाऊन पाहिले असता दागिने चोरीस गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये 44 हजार रुपयांचे मंगळसुत्र, 44 हजार रुपयांचे झुमके, 13 हजार 200 रुपयांचे कानातील टॉप्स, 13 हजार 200 बुगडी, 22 हजार रुपयांची अंगठी, 17 हजार 600 रुपयांची अंगठी, 13 हजार 200 रुपयांचे बदाम, 36 हजार 600 रुपयांच्या दोन वेढणी अंगठ्या, 17 हजार 600 रुपयांच्या कानातील दोन रिंग, 8 हजार 800 रुपयांची नथ, 8 हजार 800 रुपयांच्या लहान मुलांच्या 5 अंगठ्या व 4 बदाम, 15 हजार रुपयांची चांदीची वाटी, शिक्का, पैंजण, वाळे, कमरपट्टा, जोडण्या आदी. 2 लाख 59 हजार रुपयांच्या ऐवजाचा समावेश आहे. याबाबत संतोष कदम यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे.


