maharashtra

सराईत गुन्हेगाराकडून चोरीच्या 3 मोटार सायकली जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 stolen motorcycles seized from criminals
सातार्‍यातील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या 3 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

सातारा : सातार्‍यातील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या 3 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
प्रल्हाद शिवाजी पवार (वय 23, रा. गोपाळवस्ती, अजंठा चौक, सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
सातारा शहर व परिसरात मोटार सायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या सुचनांप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उप-निरीक्षक गणेश वाघ व स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक हे सातारा शहरामध्ये गुन्हे प्रतिबंधक अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पथकास काल दि. 23 रोजी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एकजण अजंठा चौकापासून दक्षिण बाजूस थोड्या अंतरावर हायवे रोडच्या खाली असणार्‍या बोगद्यामध्ये चोरीच्या मोटार सायकल विक्री करीत आहे. पथकाने रात्री 8 वा.च्या सुमारास जावून बोगद्याची पाहणी केली असता बोगद्यामध्ये एकजण उभा दिसला व त्याच्या बाजूला तीन मोटार सायकल दिसल्या. त्या इसमास ताब्यात घेवून त्याच्या जवळ असणार्‍या तीन मोटार सायकल कोणाच्या आहेत याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली असता त्याने या मोटार सायकली चोरुन आणल्या आहेत व त्यासाठी गिहाईक बघत आहे, असे सांगितले.
त्याच्या ताब्यातून मिळालेल्या मोटार सायकल पैकी सुझुकी गिक्सर मोटार सायकल सदरबझार सातारा, हिरो स्प्लेंडड मोटार सायकल सातारा शहरातून व टीव्हीएस व्हिक्टर मोटार सायकल दोन दिवसापुर्वी नागठाणे ता.सातारा येथून चोरल्या असल्याचे त्याने सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या सूचनांप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उप-निरीक्षक गणेश वाघ, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रविण फडतरे, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, अमित्र सपकाळ, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, गणेश कापरे, शिंवाजी भिसे, अजित कर्णे, स्वप्नील माने, मोहन पवार, विशाल पवार, केतन शिंदे, रोहित निकम, सचिन ससाणे, प्रविण पवार, पृथ्वीराज जाधव, चालक पोना गणेश कचरे यांनी केलेली आहे.